बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावरील हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोई गँगच्या 4 शूटरला अटक केली आहे. या शूटरनी पनवेलमध्ये सलमान खान याच्या गाडीवर हल्ला करून त्याचा ‘सिद्धू मुसेवाला’ करण्याचा कट रचला होता. यासाठी पाकिस्तानमधून हत्यार सप्लाय करणाऱ्यांकडून हत्यार मागवण्याचीही योजना आखण्यात आली होती. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.
पोलिसांनी अटक केलेले चारही आरोपी लॉरेन्स बिष्णोई गँगचे सदस्य आहेत. या आरोपींनी सलमान खान याच्या फॉर्म हाऊससह अनेक ठिकाणी रेकी केली होती. सलमान खानवर Ak- 47 सह अन्य अत्याधुनिक हत्यारांनी गोळीबार करण्याचे आदेश त्यांना म्होरक्याकडून मिळाले होते. यासंबंधी व्हिडिओही आरोपींच्या मोबाईलमधून जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे धनंजय उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ नहवी, वासपी खान उर्फ वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ जावेद खान आहेत. त्यानंतर पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई, संपत नेहरा, गोल्डी बरारसह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
पोलीस चौकशी दरम्यान आरोपींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. अटकेतील आरोपी अजय कश्यप पाकिस्तानमधील डोगा नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. तो एम-16, एके-47 आणि एके-92 खरेदी विक्रीचे काम करत होता. त्याच्याकडून हत्यार घेऊन सलमान खान याच्या शरीराची चाळणी करण्याचा कट आरोपींनी रचला होता.
14 एप्रिलला घरावर गोळीबार
दरम्यान, याच वर्षी 14 एप्रिल रोजी सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला होता. लॉरेन्स बिष्णोई गँगच्या दोन शूटरने हा गोळीबार केला होता. दुचाकीवरून आलेल्या शूटरने सलमानच्या घराच्या दिशेने गोळीबार करत पळ काढला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी लॉरेन्स बिष्णोई गँगकडून सुपारी मिळाल्याचे कबूल केले होते.