LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात, मुंबईपासून दिल्लीपर्यंतचे नवीन दर एका क्लिकवर जाणून घ्या…

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी मतदान सुरू असताना तेल विपणन कंपन्यांनी LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. आज 1 जूनपासून देशभरात LPG गॅस सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती 69.50 ते 72 रुपयांनी कमी केल्या आहेत.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल विपणन कंपन्या गॅस सिलिंडरचे दर नव्याने जाहीर करतात. एकतर गॅस सिलिंडरच्या दरात कपात होते किंवा वाढ होते, किंवा जैसे थे ठेवण्यात येते. मात्र यावेळी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट केली आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत मुंबई आणि दिल्लीमध्ये 69.50 रुपये, चेन्नईत 70.50 रुपये आणि कोलकातामध्ये 72 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

सलग तिसऱ्या महिन्यात कपात

निवडणुकीच्या काळात सलग तिसऱ्या महिन्यात तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे आता मुंबईत 19 किलो वजनाचा व्यवसायिक गॅस सिलिंडर 1629 रुपये, दिल्लीत 1676 रुपये, चेन्नईत 1840.50 रुपये आणि कोलकातामध्ये 1787 रुपयांना मिळेल.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल नाही

दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली असली तरी 14.2 किलोग्राम वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेल विपणन कंपन्याच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहिती नुसार घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत 803 रुपये तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीना 603 रुपये, मुंबईत 802.50, चेन्नईत 818.50 रुपये आणि कोलकातामध्ये 829 रुपये एवढी आहे.