घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राच्या दुरुस्तीचे गेल्या काही वर्षांपासून रखडलेले काम आता पूर्ण झाले आहे. दुरुस्तीबरोबर नातेवाईकांसाठी बांधण्यात आलेल्या विश्रांती रूममध्येही बसण्याची तसेच पंख्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शवविच्छेदन केंद्राच्या दुरुस्ती, नूतनीकरणासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठपुरावा केला होता.
घाटकोपरमध्ये मुंबई महापालिकेचे राजावाडी रुग्णालय आहे. रुग्णालयातील 35 वर्षांपूर्वीच्या शवविच्छेदन पेंद्राची मोठी दुरवस्था झाली होती. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या शवांचे विच्छेदन करण्याचे काम या पेंद्रात केले जाते. या कामासाठी काही तास लागतात. अशा वेळी दुःखी नातेवाईकांसाठी तात्पुरती विश्रांती रूमही बांधण्यात आलेली आहे. या रूमचीही दुरवस्था झाली होती. त्यामुळे नातेवाईकांचीही मोठी गैरसोय होत होती. त्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल आवाज उठवत शवविच्छेदन पेंद्रासह विश्रांती रूममध्ये बैठक व्यवस्था आणि पंखेही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या करिता शिवसेना, शिव आरोग्य सेना आणि त्यांच्या अंगिकृत संघटनांनी जोरदार पाठपुरावा केला होता. शवविच्छेदन पेंद्र व आजूबाजूच्या परिसराचे दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात आले आहे. या सर्व प्रयत्नांकरिता विभागातील रहिवाशांनी पोलीस सर्जन कपिल पाटील, शिवसेनेचे माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी, सचिन भांगे यांचे आभार मानले आहेत.