लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान उद्या होणार असून मंगळवार, 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून ‘इंडिया’ आघाडीचे सरकार येईल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे निकालाआधीच काँग्रेसने जल्लोषाची तयारी सुरू केली असून मध्य प्रदेश काँग्रेसकडून एक क्विंटल लाडवांची ऑर्डर देण्यात आली आहे.
भाजपने गेल्या दहा वर्षांत जनहिताची कामे केली असती तर ते निश्चितपणे तिसऱयांदा विजयी जल्लोष करू शकले असते, पण आता तसे चित्र नाही. देशातील जनता भाजपविरोधात गेली आहे. जनतेने परिवर्तनासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या बाजूने काwल दिला आहे. केवळ मध्य प्रदेशातच नाहीतर देशभरात हेच चित्र असून आता जल्लोषाची वेळ आमची आहे, असे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हाफीज म्हणाले.
मोदी जाणार, इंडिया आघाडीचे सरकार येणार
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत उत्साहाचे वातावरण आहे. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भोपाळला रवाना होण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. अनेकांनी रेल्वेच्या तिकीट बुक केल्या आहेत. जल्लोष एकदम दणक्यात होईल. त्यासाठी एक क्विंटल लाडवांची ऑर्डर दिली गेली आहे. असाच जल्लोष देशभरात होणार आहे. मोदी सरकार जाऊन देशात ‘इंडिया’ आघाडीचेच सरकार येणार आहे, असा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला.
इंडिया आघाडीला 332 जागा मिळणार?
‘इंडिया’ आघाडीला 332 जागा मिळतील तर भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ 196 जागांपर्यंत खाली घसरेल आणि अन्य पक्षांना 21 जागा मिळतील, असा अंदाज नव्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आल्याची ‘एक्स’ पोस्ट मध्य प्रदेश काँग्रेसने केली आहे. हे अंतिम सर्वेक्षण असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.