मी 2 जूनला दुपारी 3 वाजता आत्मसमर्पण करणार आहे. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जाणार आहे. तुरुंगात माझा आणखी छळ करण्याचा प्रयत्न होईल, पण मी झुकणार नाही. माझा जीव गेला तरी दुःखी होऊ नका, माझ्या वृद्ध, आजारी मातापित्यांची काळजी घ्या, असा संदेश आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दिला.
दिल्लीकर आणि देशवासीयांसह आपच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल केजरीवाल यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आम्ही सर्व मिळून हुकूमशाहीशी लढत आहोत… देश वाचवताना मला काही झालं, माझा जीवही गेला तर दुःखी होऊ नका. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहे याचा मला अभिमान आहे. त्यांनी मला नामोहरम करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत, असे केजरीवाल यांनी सांगितले.
प्रत्येक महिलेला दरमहा 1 हजार रु. देण्याची घोषणा
मी तुमच्यामध्ये नसलो तरी काळजी करू नका, तुमची सर्व कामे सुरूच राहतील… आणि परत आल्यावर मी प्रत्येक आई आणि भगिनीला दर महिन्याला एक हजार रुपये द्यायला सुरुवात करेन, अशी घोषणा केजरीवाल यांनी या वेळी केली.
अर्जावर आज सुनावणी
प्रचारादरम्यानच केजरीवाल यांना काही गंभीर आजाराची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांनी वैद्यकीय तपासण्यांसाठी जामिनाला मुदतवाढ मिळावी असा अर्ज कोर्टात केला आहे. उद्या शनिवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे.