>> ज्ञानदेव एकनाथ उंडे
अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कर्तृत्व गाजविणारे शिक्षण तज्ञ डॉ. मोहनराव गंगाराम हापसे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. डॉ. हापसे हे कित्येकांचा आधार कित्येकांची सावली तर कित्येकांची भाकरी होती. कृतज्ञता भावनेने सर्वांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. डॉ. मोहनराव हापसे म्हणजे शिक्षण क्षेत्रातील आदराचे स्थान असलेलं व्यासंगी व्यक्तिमत्त्व. प्राध्यापक ते विद्यापीठाचा कुलगुरू हा त्यांचा प्रवास आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांचा जन्म प्रवरा नदीच्या तीरी नेवासा बुद्रुक या छोटय़ाशा खेडेगावात सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. परिस्थितीवर मात करून मोठय़ा कष्टाने डॉ. मोहनराव हापसे यांनी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने पास होण्याचा मान मिळवला. पुढे शिक्षणासाठी ते नगर येथे आले. नंतर पुणे विद्यापीठ नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि सीनसिनाटी विद्यापीठ अमेरिका असा त्यांचा शिक्षणाचा चढता आलेख राहिला. तीन वर्षे अमेरिकेत राहून 1970 साली ते मायदेशात परतले. हिंदुस्थानात आल्यावर त्यांना लगेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. तेथेही त्यांनी आपल्या ज्ञानाचे कसब दाखविले. त्यांच्या ठायी विज्ञान, गणित, भूगोल, खगोलशास्त्र, इतिहास, नीती व मानसशास्त्र यांचे सखोल ज्ञान होते. त्यांचे कर्तृत्व ओळखून डॉ. पद्मश्री विखे पाटील यांनी 1971 मध्ये प्रवरानगर येथे स्थापन केलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. त्यांनी भविष्यात महाविद्यालयाला शहरी महाविद्यालयाच्या रांगेत बसविले. ग्रामीण भागापर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन कॉलेजपर्यंत त्यांना आणले व शिक्षण दिले. ‘कमवा व शिका’ मुले व मुलींसाठी वसतिगृहे, विद्यार्थ्यांसाठी संशोधन पेंद्र सुरू केले. या योजनेचा अवलंब, विद्यार्थी व शिक्षक यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांचे हे कर्तृत्व पाहून संस्थेने त्यांना काही काळ प्रवरा रुरल एज्युकेशन संस्थेच्या सचिवपदी नेमले. महाराष्ट्र सरकारने त्यांना 1983 साली आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.
1990 साली शिक्षण क्षेत्रातील त्यांचे ज्ञान, कार्य कर्तुत्व यांचा नियतीने खऱया अर्थाने सन्मानच केला. त्यांची पुणे विद्यापीठात प्र. कुलगुरू म्हणून निवड झाली. येथेही त्यांनी आपल्या कार्याचा कायमचा ठसा उमटविला. अनेक धाडसी निर्णय घेऊन प्रशासनाला योग्य शिस्त लावली. अनेक प्रलंबित प्रश्न कायमचेच मार्गी लावले. विद्यापीठाच्या बोकाळलेल्या बेशिस्तीला वेळीच लगाम घातला. विद्यापीठाच्या परीक्षा, प्रश्नपत्रिका, पेपरफुटीचे प्रकार, कामातील विलंब तसेच विद्याशाखांचा विस्तार नवीन इमारतींची उभारणी, विद्यापीठांची आर्थिक परिस्थिती अशा अनेक गोष्टीत त्यांनी आमूलाग्र बदल केला.
डॉ. हापसे यांच्या शिक्षण क्षेत्रातील ज्ञानाचा आपल्या शिक्षण संस्थेला निश्चितच फायदा होईल हे जाणून खासदार चंद्रभान बाळाजी आठरे यांनी 1983 मध्ये संस्थेचे विश्वस्त म्हणून त्यांची नियुक्ती केली. पुढे संस्थेचे सहसचिव, अध्यक्ष व ज्येष्ठ विश्वस्त म्हणून त्यांनी संस्थेच्या विकासामध्ये कायम स्मृतीत राहील अशी कामगिरी केलेली आहे.