मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय! ‘या’ दिवशी विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर, 2 परीक्षाही पुढे ढकलल्या

मध्य रेल्वे मार्गावर आजपासून (31 मे 2024) ते रविवारपर्यंत (02 मे 2024) 63 तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या माध्यमातून प्रामुख्याने तांत्रिक कामांसाठी हा जम्बोब्लॉक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये 930 लोकल फेऱ्या आणि 72 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. गुरुवारी मध्यरात्री ब्लॉकला सुरुवात झाली असून रविवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. ठाणे येथे फलाट क्रमांक 5/6 ची रुंदी वाढविण्यासाठी 63 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट क्रमांक 10/11 ची लांबी वाढविण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुंबई विद्यापीठाने महत्वाचा निर्णय घेत 1 जून 2024 रोजी शिक्षक, अधिकारी/कर्मचारी यांना सुट्टी देण्यात येणार असल्याची जाहिर केले आहे.

1 जून 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे दुसरा शनिवार, दिनांक 8 जून 2024 रोजी सुट्टीच्या दिवशी विद्यापीठ कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर 1 जून रोजी इंजिनीअरिंग सेमिस्टर 8 ची आणि बीएमएस 5 वर्ष इंटिग्रेटेड सेमिस्टर 2 ची परिक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षांची पुढची तारिख लवकरच कळविण्यात येणार आहे.