मनोज म्हात्रे हत्याकांडात कपिल पाटील, सुमित पाटील यांचा हात; बाळ्यामामा म्हात्रे यांचा केंद्रीय मंत्रावर गंभीर आरोप

भिवंडीतील काँग्रेस नेते नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीयमंत्री कपिल पाटील व त्यांचा पुतण्या सुमित पाटील यांचाच हात आहे. म्हात्रे यांच्या हत्याकांडानंतर अटक असलेल्या आरोपीचा सुमित पाटील यांच्याशी सतत मोबाईलवर संपर्क सुरू होता. मात्र राजकीय वरदहस्तामुळे आतापर्यंत कपिल पाटील बचावले आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी आज केला आहे. म्हात्रे यांच्या या आरोपामुळे ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शहरातील पद्मानगर परिसरातील श्रीनिवास नडीगोदू उर्फ स्वामी यास काही दिवसांपूर्वी मानसरोवर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास बेदम मारहाण झाली होती. दुचाकीस साईड न दिल्याच्या रागातून मारहाण झाल्याची तक्रार दिल्याने याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 12 अज्ञात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु त्यानंतर ही मारहाण आपण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान व मदत केल्याचा राग मनात धरून केल्याचा आरोप श्रीनिवास नडीगोदू उर्फ स्वामी यांनी केला होता. जखमी स्वामी यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून गुरुवारी सकाळी बाळ्यामामा यांनी रुग्णालयात जाऊन स्वामी यांची भेट घेतली. यावेळी बोलताना बाळ्यामामा यांनी कपिल पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचे हे कृत्य निषेधार्थ असून राजकारणात अशा प्रकारे चिडून जाणे व कार्यकर्त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे, असे ठणकावून सांगितले.

4 जूननंतरच पुरावे देणार

कपिल पाटील यांनी त्यांची दादागिरी थांबवावी. याआधीदेखील त्यांनी माजी आमदार योगेश पाटील यांच्या घरावर हल्ला केला होता. मनोज म्हात्रे प्रकरणातदेखील त्याचा हात होता. अनेक कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करण्यात त्यांचाच हात असून या सर्व प्रकरणात पोलीस सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही लावून धरणार असून पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. 4 जूनच्या लोकसभा निवडणूक निकालानंतर कपिल पाटील यांच्या दादागिरीचे व हत्याकांडाची प्रकरणे आपण स्वतः पुराव्यानिशी बाहेर काढू, कपिल पाटलांनी त्यांची दादागिरी थांबवावी, असा इशारादेखील बाळ्यामामा म्हात्रे यांनी कपिल पाटील यांना यावेळी दिला.