पाकिस्तानने पुन्हा डोळे वटारले; कधीही अण्वस्त्र हल्ला करू शकतो

अण्वस्त्रांचा पहिल्यांदा वापर करायचा नाही हे धोरण पाकिस्तानसाठी मुळीच नाही. आम्ही कधीही हल्ला करू शकतो. शत्रुराष्ट्रांच्या धमक्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील बेफिकीर नेत्यांनी अवास्तव विधाने करू नयेत, कारण हिंदुस्थानच्या डोळय़ात डोळे घालण्याची हिंमत आमच्यात अण्वस्त्रसामर्थ्यामुळे आहे, अशा शब्दांत पाकिस्तानने हिंदुस्थानवर पुन्हा डोळे वटारले आहेत. मोदी सरकारकडून वारंवार पाकव्याप्त कश्मीरबद्दल करण्यात येणाऱया विधानांना पेंद्रस्थानी ठेवूनच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे सल्लागार आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल खालिद अहमद किडवई यांनी हिंदुस्थानला धमकी दिली आहे.

1998 रोजी झालेल्या पाकिस्तानातील अण्वस्त्र चाचणीच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात किडवई बोलत होते. पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तपत्राने किडवई यांच्या भाषणाचे वृत्त दिले आहे. धोरणात्मक नियोजन विभागाच्या महासंचालकपदीही किडवई यांनी काम केले होते. पहिल्यांदा अण्वस्त्र हल्ला न करण्याचे धोरण पाकिस्तानसाठी नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आमच्या पापण्या जराही लवणार नाहीत

पाकिस्तानचे अण्वस्त्र शस्त्रागार हे प्रतिबंधात्मक धोरणांसाठी किंवा अण्वस्त्र युद्ध न लढण्यासाठी नाही. त्यामुळे पाकिस्तानचे शत्रू किंवा मित्रराष्ट्र कुणीही पाकिस्तान पहील्यांदा अण्वस्त्र हल्ला न करण्याच्या धोरणाचा अवलंब करेल या भ्रमात कुणीही राहू नये. विशेषतः हिंदुस्थानातील नेत्यांनी तसा विचार करू नये. कारण हिंदुस्थानच्या डोळय़ात डोळे घालून बघण्याची हिंमत आमच्यात असून आमच्या पापण्या जराही लवणार नाहीत, असेही किडवई यांनी म्हटले आहे.

लाहोर कराराचे उल्लंघन ही आमची चूकच झाली; नवाज शरीफ यांची कारगिलबाबत कबुली

आमच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र

पाकिस्तानकडे अत्यंत अत्याधुनिक अशी अण्वस्त्र शस्त्रास्त्रs आहेत. शत्रुच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य पाकिस्तानच्या शस्त्रागाराकडे आहे, असेही किडवई यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या भरभक्कम आण्विक सामर्थ्यामुळेच आशिया खंडात शांतता टिकून राहिली आहे, असा दावही किडवई यांनी केला.

तिन्ही दलांकडे अण्वस्त्रसामर्थ्य

पाकिस्तानच्या सैन्य, हवाई आणि नौदल या तिन्ही दलांकडे अण्वस्त्र सामर्थ्य आहे. भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अण्वस्त्र चाचणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 2 हजार 750 किलोमीटरचा टप्पा असणाऱया हिंदुस्थानच्या प्रमुख महानगरांना लक्ष्य करण्याचे सामर्थ्य अण्वस्त्रांमध्ये आहे, असेही किडवई म्हणाले.