हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदाने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत नवा इतिहास घडविला. त्याने अव्वल मानांकित यजमान देशाच्या मॅग्नस कार्लसनला क्लासिकल चेसमध्ये कारकीर्दीत प्रथमच पराभूत करण्याचा पराक्रम केला. या विजयासह प्रज्ञानंदाने स्पर्धेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. प्रज्ञानंदाची बहीण आर. वैशाली हिनेही महिलांच्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सर्वाधिक 5.5 गुणांची कमाई अव्वल स्थानी झेप घेतलीय.
हिंदुस्थानच्या 18 वर्षीय आर. प्रज्ञानंदाने मॅग्नस कार्लसनला याआधी जलदगती आणि प्रदर्शनीय सामन्यात हरविले होते. आता त्याने क्लासिकल प्रकारातही त्याला पराभूत केले. या विजयासह तीन फेऱयांनंतर तो 5.5 गुणांसह आघाडीवर आहे. प्रज्ञानंदा कार्लसनला हरविणारा चौथा हिंदुस्थानी बुद्धिबळपटू ठरला, हे विशेष. पांढऱया मोहऱयांनिशी खेळणाऱया प्रज्ञानंदाने कार्लसनला हरवून त्याची गुणतालिकेत थेट पाचव्या स्थानी ढकलले. या दोघांनीही आपल्या मागील तीन लढती बरोबरीत सोडविल्या होत्या. आता चौथ्या फेरीत हिंदुस्थानच्या प्रज्ञानंदाचा सामना नाकामुराशी होईल.
तिसऱया फेरीतील इतर लढतीत द्वितीय मानांकित अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याने विद्यमान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. या पराभवसह लिरेन गुणतक्त्यात सहा खेळाडूंमध्ये अखेरच्या स्थानी राहिला. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने फ्रान्सच्या अलिरेजा फिरोजा याचा सडन डेथमध्ये (आर्मागेडन) पराभव करीत अतिरिक्त अर्ध्या गुणांची कमाई केली. आता तो गुणतक्त्यात तिसऱया स्थानावर आलाय.
बहिणीचेही प्रज्ञानंदाच्या पावलावर पाऊल
प्रज्ञानंदाची बहीण आर. वैशाली हिनेही महिलांच्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सर्वाधिक 5.5 गुणांची कमाई करीत आपल्या बंधूच्या पावलावर पाऊल ठेवत गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली. वैशालीने अन्ना मुझिचुक हिला बरोबरीत रोखले. त्याआधी तिने आपल्याच देशाच्या कोनेरू हम्पीला हरविले होते. क्लासिकल लढतीत प्रत्येक विजयासाठी तीन गुण मिळतात. दुसऱया फेरीअखेर वैशालीकडे चार गुण होते.