आयपीएल गाजवणारे जसप्रीत बुमरा आणि ट्रव्हिस हेड हे दोघे टी-20 वर्ल्ड कप गाजवणार असल्याची भविष्यवाणी ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉण्टिंगने वर्तवली आहे. आता त्याचे भाकीत किती खरे ठरते ते दिसेलच.
यंदाच्या आयपीएलमध्ये हिंदुस्थानचा भन्नाट गोलंदाज जसप्रीत बुमराने सुस्साट गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आली नसली तरी बुमराने 13 सामन्यांत 20 विकेट टिपल्या. दुसरीकडे हैदराबादला तूफानी सलामी देणाऱया हेडने 15 सामन्यात 567 धावा ठोकल्या. हे दोघेच अमेरिका-पॅरेबियनमध्ये आपल्या खेळाचा सर्वोच्च दर्जा दाखवतील, असे प्रामाणिक मत पॉण्टिंगने व्यक्त केलेय. या वर्ल्ड कपमध्ये एकही गोलंदाज बुमराच्या तोडीचा नाही. तो विकेटच टिपत नाही तर त्याच्या गोलंदाजीवर धावा काढणे फलंदाजांसाठी नेहमीच आव्हानात्मक ठरले आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर षटकामागे 7 धावाही काढता आल्या नाहीत. त्यामुळे जबरदस्त फॉर्मात असलेला बुमराच माझा आवडता गोलंदाज असल्याचे पॉण्टिंगने सांगितले.
फलंदाजांमध्ये ट्रव्हिस हेडच्या फटकेबाजीने सर्वांनाच वेड लावले. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱया फलंदाजांच्या यादीत चौथा असला तरी त्याच्या 200 च्या स्ट्राईक रेटला कुणीही ओलांडू शकलेला नाही. सध्या त्याचा साहसी खेळ संघाला खूप फायदेशीर ठरणार, हे निश्चित आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने पांढराच नव्हे तर लाल चेंडूवर आपले वर्चस्व गाजवले आहे. फलंदाजीत धमाके केल्यानंतर शेवटच्या चारपैकी तीन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला. त्याच्या कामगिरीत चढउतार असला तरी या फलंदाजांना अनेक सामन्यांत आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिल्याचेही पॉण्टिंग म्हणाला.