दक्षिण आशियाई युथ टेबल टेनिस स्पर्धेत एकेरीत सायली वाणी हिने, तर दुहेरीत तनिशा कोटेचाने सुवर्ण पदक पटकावले आहे. सांघिक स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ अव्वल ठरला. श्रीलंका येथे ही दक्षिण आशियाई युथ टेबल टेनिस स्पर्धा संपन्न झाली. यात हिंदुस्थान, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश व मालदीवचे संघ सहभागी झाले होते. यात 19 वर्षांखालील मुलींच्या गटात एकेरीत सायली वाणी हिची अंतिम लढत पुण्याच्या पृथा वर्टीकरशी झाली. यात पृथाचा 3-1 ने सहज पराभव करीत सायली सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. तनिशा कोटेचाने मुंबईच्या रिशा मिरचंदानीच्या जोडीने 19 वर्षांखालील दुहेरीत नेपाळच्या बिनाका रॉय व एव्हाना थापर मगर या जोडीचा पराभव करून सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्या जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. 19 वर्षांखालील गटाच्या सांघिक स्पर्धेत यजमान श्रीलंकेचा हिंदुस्थानी संघाने 3-0ने पराभव करून युथ टेबल टेनिसचे विजेतेपद पटकावले. संघात महाराष्ट्राच्या पृथा वर्टीकर, तनिशा कोटेचा, सायली वाणी व रिशा मिरचंदानी यांचा समावेश होता.