ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर; महाबळेश्वरात चंदनचोर जाळय़ात

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे दोन चंदनचोर जेरबंद करण्यात महाबळेश्वर वन विभाग व पोलिसांना यश आले आहे. या चोरटय़ांकडून 17 किलो 231 ग्रॅम वजनाच्या चंदनाच्या लाकडासह चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वन विभागाने या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय अर्जुन चव्हाण (रा. फत्तेपूर, ता. सातारा) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील वानवली तर्फ आटेगाव या गावच्या हद्दीत रात्री अशोक उतेकर यांच्या मालकीच्या जागेत असलेल्या चंदनाचे झाड काही व्यक्ती तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलीस पाटील सुभाष कदम यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे ही माहिती पोलीस व वन विभागास कळविली. माहिती मिळताच, ग्रामसुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस व वन विभागाच्या पथकांनी वाणवली तर्फ आटेगाव येथील घटनास्थळाकडे धाव घेतली. यंत्रणेने ही माहिती गावातील सर्वांना मोबाईलवर कळविल्याने गावकरी सतर्क झाले व त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकरी येत असल्याचे पाहताच चोरटय़ांनी पळ काढला. ग्रामस्थांनी चोरटय़ांचा पाठलाग केला. मात्र, चोरटय़ांनी वाहनातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी वन विभाग व पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी चोरटय़ांना जेरबंद केले.

वन विभागाचे उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, तर सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे यांनी चंदनचोरांवर गुन्हा दाखल केला. महाबळेश्वर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, उपनिरीक्षक रौफ इनामदार, वनपाल अर्चना, वनरक्षक संदीप पाटोळे, हवालदार संतोष शेलार यांनी ही कारवाई केली. तापोळा वनपाल अर्चना शिंदे तपास करीत आहेत.