रुग्णाला रुग्णालयात भरती केल्यानंतर रुग्णाची आरोग्यविमा पॉलिसी असल्यास उपचार कॅशलेस करण्याविषयीची परवानगी संबंधित विमा कंपनीने त्या रुग्णालयाला तासाभरात द्यावी, असा आदेश भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इरडा) दिला आहे. यासंदर्भात इरडाने एक परिपत्रक जारी केले आहे. यामुळे कॅशलेससाठी इरडाने प्रसिद्ध केलेली 55 परिपत्रके रद्दबातल ठरली आहेत. या नव्या परिपत्रकामुळे आरोग्यविमा पॉलिसीधारकाला अधिक अधिकार मिळाले असून आरोग्यविम्याचाही प्रसार होण्यास मदत मिळणार आहे. नव्या नियमामुळे पॉलिसीधारक रुग्णाला रुग्णालयात भरती झाल्यावर उपचार सुरू होण्यात विलंब होणार नाही.
परिपत्रकात काय आहे?
n विमा कंपन्यांना विविध प्रकारचे आरोग्यविमा पुरवणे शक्य होईल.
n सर्व वयोगटांसाठी व सर्व प्रकारच्या वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींनाही आरोग्यविमा देणे शक्य होणार आहे.
n सर्व प्रकारच्या रुग्णालयांचा समावेश यात करण्यात येणार आहे.
n विम्याचा प्रकार, विमा संरक्षणाची रक्कम, विमा संरक्षण दिल्याचा तपशील, उपमर्यादा, वजावटी आणि प्रतीक्षा कालावधी या सर्वांविषयी माहिती.
n विमा पॉलिसी देण्यापासून ते पॉलिसीचा दावा मंजूर करण्यापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे व्हावा, याविषयी माहिती.