मुंडे बहीण-भाऊ कार्यकर्त्यांना भडकावत असल्याचा स्पष्ट आरोप मनोज जरांगे यांनी केला. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या व्यासपीठावर बसणार्या मराठा नेत्यांनाही जरांगे यांनी खडे बोल सुनावले.
केज तालुक्यातील नांदूरघाट येथे काल झालेल्या दगडफेकीत जखमी मराठा समाज बांधवांची मनोज जरांगे पाटील यांनी आज भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी मुंडे बहिण-भावावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांना मराठ्यांची मते लागतात, मराठा नेतेही पाहिजेत. मराठ्यांच्या जीवावर मोठे व्हायचे आणि त्याच गोरगरिब मराठ्यांवर अन्याय करायचा. अनेक वर्षांपासून हे सत्र सुरू आहे. मराठा समाज हा अन्याय खूप वर्षांपासून सहन करतोय. आष्टी, पाटोद्यात काय झाले? बीडमध्ये काय झाले, परळीमध्ये काय झाले? हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मराठ्यांचा जीवच त्यांना घ्यायचा आहे तर घेऊ द्या असे मनोज जरांगे म्हणाले.
मराठ्यांची मते घ्यायची, त्यांची मदत घ्यायची आणि शेवटी मराठ्यांचीच जात संपवायची हा खरा अपमान आहे. ही हार त्यांच्या व्यासपीठावर बसणार्या मराठा नेत्यांची आहे असेही जरांगे म्हणाले. मलाही धमक्या दिल्या जात आहेत. पण मराठा समाजाचे संरक्षण कवच मला आहे. बीडमध्ये येऊ देणार नाही असेही धमकावले जात आहे. पंकजा मुंडेंना फिरू देऊ नका असे मी कधीही म्हणालो नाही. हा प्रत्येकाचा अधिकार आहे असेही जरांगे म्हणाले.
भीषण पाणीटंचाईमुळे 8 जूनची सभा रद्द
सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि भीषण पाणीटंचाईमुळे नारायणगडावर 8 जून रोजी होणारी जाहीर सभा रद्द करण्यात येत असल्याचे मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतीने आज गुरुवारी बीड येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये सभा रद्दची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला अॅड.मंगेश पोकळे, अनिल जगताप, दिलीप गोरे, अजित वरपे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सभेची नवीन तारीख लवकरच घोषित करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.