मी तुमच्यासारखा गद्दार नाही, मला बोलायला लावू नका, उरली सुरली राहू द्या, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांनी मिंध्यांची सालटी काढली.
ठाणे येथे पत्रकार परिषदेत विचारे बोलत होते. मिंध्यांवर जोरदार हल्लाबोल करताना विचारे म्हणाले की, 2014 ला यांच्या मुलासाठी संपूर्ण सैन्य घेऊन कल्याणला गेले होते. राजन विचारेंना वाऱ्यावर सोडून एकनाथ शिंदे कल्याणला गेले होते, तेव्हा वृत्तपत्रांमध्ये बातम्याही आल्या होत्या. त्याही परिस्थितीत मी निवडणूक लढलो आणि निवडून आलो. फक्त त्यांचा मुलगा आणि ते एवढंच त्यांचं राजकारण होते. माझ्याकडे खोके नव्हते, मी पैशाच्या जीवावर निवडून आलो नाही. आनंद दिघे आणि उद्धव ठाकरेंमुळे मला सर्वकाही मिळालं, असं विचारे यावेळी म्हणाले.
मिंध्यांच्या खोकेबाजीवर हल्लाबोल करताना विचारे म्हणाले की, मी तुमच्यासारखा गद्दार नाही, मला बोलायला लावू नका, उरली सुरली राहू द्या. नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जात होता, उद्धव ठाकरे म्हणाले म्हणून त्याला मी थांबवलं. याच नरेश म्हस्केला राजन विचारे घेऊन आला होता. तो काँग्रेसमध्ये चालला होता, शिवाजी मैदानमध्ये त्याचा प्रवेश होता. त्यावेळेला मी त्याला थांबवलं, असं विचारे यावेळी म्हणाले
‘आनंद दिघे साहेबांमुळे ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. मला 40 वर्ष झाली, मी आनंद दिघेंसोबत होतो. यांचा उदय दिघे साहेब गेल्यानंतर झाला. त्यावेळी नरेश म्हस्के कुठे होते? 1966 साली सेनेची स्थापना झाली, ती दिघे यांनी वाढवली. मातोश्रीवर दिघे साहेब यादी पाठवायचे आणि मग ती फायनल व्हायची आणि तिकीट फायनल व्हायचं. माझ्याकडे पैसे नव्हते. सर्वसामान्य कर्तकर्ता म्हणून काम केलंय. सभागृह नेते पद मी यांच्यासाठी सोडलं. तुम्ही चित्रपट काढला दिघेंवर, कुठे पैसा खर्च केला. मी शो घेतले कार्यकर्त्यांच्या पैशाने चित्रपट काढला. ठाणे महापालिकेची वाट तुम्ही लावली आणि तुम्ही काय बोलताय?, असा रोखठोक सवालही विचारे यांनी मिध्यांना केला.