कर्नाटकमध्ये उघड झालेल्या अतिशय घृणास्पद अशा प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणात तपास सुरू आहे. या दरम्यान, रेवण्णाच्या अत्याचारांच्या बळी ठरलेल्या अनेक महिलांनी घर सोडल्याची माहिती मिळत आहे. रेवण्णाने केलेल्या अत्याचारांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हासन जिल्ह्यातील अनेक महिला बेपत्ता आहेत. रेवण्णाशी संबंधित महिलांना त्यांच्या नवरे प्रश्न विचारू लागले असून त्यातील काहींनी याच कारणाने घर सोडल्याचं बोललं जात आहे.
हासन या जिल्ह्याला जेडीएसचे प्रमुख एच डी देवेगौडा यांचा गड मानला जातो. प्रज्ज्वल हा त्यांचा नातू असून तो निवडणुकीला उभा होता. मात्र, 28 एप्रिल रोजी ज्या पीडित महिलेने तक्रार दाखल केली होती. त्या महिलेचं कुटुंब आता बेपत्ता आहे. ही महिला रेवण्णाच्या घरी काम करत होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या घराला कुलूप आहे. ती कुठे गेली, याचा कुणालाही ठावठिकाणा माहीत नाही, अशी माहिती शेजारी सांगत आहेत.
प्रज्ज्वलविरुद्ध बलात्काराची तक्रार करणाऱ्या एका माजी जिल्हा पंचायत सदस्य महिलेच्या गावातही हाच प्रकार उघड झाला आहे. प्रज्ज्वल याच्यासोबत काम करणाऱ्या अनेक महिलांनी त्याच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावरून हटवायला सुरुवात केली आहे. काही प्रकरणांमध्ये संबंधित महिलांना त्यांच्या नवऱ्यांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तसंच, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक महिलांची ओळख उघड झाली. त्यामुळे हासन जिल्ह्यातील अनेक महिला तेव्हापासून घर सोडून बेपत्ता झाल्या आहेत.