रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजापूर तालुक्यात भाजप पक्षाचे काही अनोळखी व्यक्ती स्थानिक व्यक्तींच्या सहाय्याने मतदारांना जबरदस्तीने दबाव आणून पैसे वाटत असल्याची लेखी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
आमदार राजन साळवी यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी तक्रारीत राजापूर तालुक्यात तुळसुंदे, कुवेशी, जैतापूर, माडबन, मिठगवाणे आणि संपुर्ण राजापूर तालुक्यात भाजप पक्षाचे अनोळखी व्यक्तींच्या सहाय्याने मतदारांना भुलविण्यासाठी लोकसभा निवडणूकीत भाजपला मतदान करण्यासाठी मतदारांवर जबरदस्तीने दबाव आणून पैसे वाटप करत आहेत. जरी मतदार पैसे घेत नसला तरी जबरदस्तीने त्याला पैसे देऊन त्याची सही घेतली जात आहे. अशाप्रकारे मतदारांवर दबाव टाकून आचारसंहितेचा भंग केला जात आहे. परजिल्ह्यातील अनोळखी वाहनातून पैसे येत असून त्याची देखील सखोल चौकशी करावी पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी केली.