आता रायगडालाच नव्हे तर संपूर्ण देशाला जाग आली आहे. आम्हाला पाकिस्तानची भीती कसली दाखवताय, तुमच्या दिल्लीच्या आसनाखाली लोकशाहीचा बॉम्ब फुटणार आहे, त्याचं काय करायचं ते बघा, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांना ठणकावलं. रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मोदी शहांवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, ‘आपली जी घोषणा आहे, कोण आला रे कोण आला. 4 जूनला दिल्लीकरांना कळलं पाहिजे की शिवसेनेचा वाघ आला. नाहीतर या घोषणेत काहीही अर्थ नाही. आता मोदी आणि शहा सगळीकडे फिरताहेत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा रायगडकरांनी दोन चक्रीवादळांचा सामना केला होता. मग ते रायगडकर या फडफडणाऱ्या पंख्यांचा सामना करू शकत नाही का? ती दोन चक्रीवादळं होती ही दोन महाराष्ट्रावर आदळणारी वक्रीवादळं आहेत. चक्रीवादळाचा सामना करणारा रायगडकर या वक्रीवादळांचा सामना केल्याशिवाय राहणार नाही. हा माझा आत्मविश्वास आहे.’
‘निवडणुका आता टप्प्याटप्प्यात घ्यायला लागलेले असताना आपल्याला ते फुलटॉस द्यायला लागले आहेत. हल्ली आयपीएल मी पाहतच नाही. कारण कुठला खेळाडू कुठल्यातरी भलत्याच संघाकडून खेळतो. हा खेळ बोली लावून खेळला जातो, पण तो खेळ आहे. या बोल्या आता राजकारणात लागायला लागल्या आहेत. काल जो या पक्षात होता, तो तिकडे गेला. आज भाजपची दयनीय अवस्था झाली आहे. रायगड आपण कुणाचा म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपतींनी या मातीचा आणि माणसांचा गुण ओळखला असेल म्हणून राजधानी केली असेल. आपण शूरा मी वंदिले म्हणतो, भाजप म्हणतो चोरा मी वंदिले. तू चोरी कर मी वंदन करतो. जसं आरतीत घालीन लोटांगण तसं हे चोरांना वंदन करताहेत. ही एवढी पाळी का आली? जर दहा वर्षांत कामं केली तर फोडाफोडी आणि अपप्रचार करण्याची वेळ नसती आली. आज मोदी आणि शहा महाराष्ट्रात खेटे घालताहेत. हीच वेळ आहे. यांना दोन वेळा महाराष्ट्राने भरभरून दिलं, कारण शिवसेना सोबत होती. इतकं करूनही तुम्ही महाराष्ट्राच घात केलात. आता अफवा पसरवताहेत. मध्येच त्यांना माझ्याविषयी बोलायचं असतं.. उद्धव ठाकरेंवर संकट आलं तर म्हणतात.. पण माझं सुरक्षा कवच माझ्या सोबत आहे. मोदीजी मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही. माझ्या आईवडिलांच्या आणि आई जगदंबेच्या कृपेचं कवच माझ्याभोवती आहे. उलट मोदी, तुम्ही संकट म्हणून माझ्यावर आला आहात. ‘कालच्या धाराशिवच्या सभेत आई तुळजाभवानी माझ्यासमोर अवतरली होती. लोकं एवढी चिडून उठली आहेत की ती वाट बघताहेत, 7 मे, 13 मे, 20 मे, 4 जून कधी येतोय. तारीख येतेय कधी आणि ठोकतोय कधी याची लोक वाट बघताहेत. कारण मोदी शहा आणि भाजपने खोटं बोलण्याचं काम केलं आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की ते माझी चौकशी करत होते. मग तुमच्या चेल्या चपाट्यांना माहीत नव्हतं का की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे.? मी रुग्णालयात असताना रात्री अपरात्री माझ्या गद्दारांशी हुडी घालून चर्चा कोण करत होतं? हे तुम्हाला माहीत नव्हतं? माझं सरकार गद्दारी करून खाली खेचताय, गद्दारांना खरी शिवसेना म्हणून मिरवताय हे माझ्यावरचं तुमचं प्रेम? एक तुम्हाला हिंदुहृदयसम्राट हा शब्द उच्चारायला जड जातंय. शिवसेनाप्रमुखांचे आपल्यावर खूप कर्ज आहे म्हणता, हे कर्ज आता महाराष्ट्राची जनता व्याजासह फेडल्याशिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
‘गुजरातवर माझा आकस नाही. पण तुम्ही महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवून गुजरातला नेला. इंडिया आघाडीचं सरकार आलं तर मी महाराष्ट्राचं गेलेलं वैभव पुन्हा आणल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना गुजरातमध्ये प्रकल्प न्यायचे असतील त्यांनी बारसूची रिफायनरी घेऊन जा, जैतापूरचा प्रकल्प गुजरातला न्या. पण विनाशकारी प्रकल्प कोकणावर लादू नका. मोदी शहांना आता पराभवाचं भूत दिसतंय म्हणून ते सगळीकडे रा राम बोलताहेत. त्यांनी जय भवानीलाही आक्षेप घेतला. मोदी आणि शहा तुम्ही आज आहात उद्या नसाल. पण जय भवानी, जय शिवाजी अनंत काळापर्यंत असणार आहे. भगव्याला डाग लावणाऱ्यांसोबत हा शिवसेनाप्रमुखांचा पुत्र कधीही जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
‘सध्या भाजपच्या जाहिरातीचा कहर झाला आहे. यांना निवडणूक आल्यावर पाकिस्तान आठवतोय. काल परवाकडे पूंछकडे हल्ला झाला, तिथे आपले सैनिक शहीद झाले. पण, तिथे गृहमंत्री गेले नाहीत. ते फक्त उद्धव ठाकरे संपला पाहिजे इकडेच लक्ष देताहेत. अरे उद्धव ठाकरे मोठा की देश मोठा? उद्धव ठाकरेंना खतम करण्यासाठी नव्हे तर पाकिस्तानला खतम करण्यासाठी लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत. तुमच्या पराभवामुळे माझ्या हिंदुस्थानात फटाके फुटणार आहेत. तुमच्या धोतरात चीन घुसलाय, तरी तुम्ही नेभळटासारखं काही करत नाही. तुम्ही आम्हाला कसली पाकिस्तानची भीती दाखवताय? तुमच्या दिल्लीच्या आसनाखाली लोकशाहीचा बॉम्ब आता फुटणार आहे, त्याचं बघा काय करताय ते.. तुम्ही सर्वांना सर्वकाळ फसवता येत नाही. आता रायगडालाच नव्हे तर देशालाही जाग आलेली आहे. आणि देशाला जाग आल्यानंतर काय होतं, हे आता या सरकारला कळणार आहे.’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांना ठणकावले.