प्रसिद्ध मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 54व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कर्करोगाचं निदान झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या ते चर्चा तर होणारच या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
कर्करोगामुळे अनेक अवयव निकामी होत असल्याने ते गेले काही दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमाराला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी दुपारच्या सुमाराला त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. एकुलती एक, आयडियाची कल्पना अशा चित्रपटांमध्ये ते दिसले होते. अभिनयाखेरीज त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केलं होतं. एक अभ्यासू अभिनेता आणि लेखक-दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती.