>> संजय मिस्त्री
कार्टुनिस्टस् कंबाईन’ ही अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांची संस्था 1983 साली शिवसेना भवन येथे मा. बाळासाहेब ठाकरे यांनी असंख्य व्यंगचित्रकारांच्या उपस्थितीत स्थापन केली. या संस्थेतर्फे दरवर्षी चार जाहीर कार्यक्रम केले जातात. या वर्षी साहित्य मंदिर, सेक्टर 6, वाशी, नवी मुंबई येथे दोन दिवसीय भव्य ‘कार्टून महोत्सव’ होत आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख.
व्यंगचित्रकलेचा इतिहास प्राचीन आहे. हजार शब्दांचं काम एक व्यंगचित्र करतं असं म्हटलं जातं. हे खरं आहे. व्यंगचित्राची ताकद काय असते हे जगाला मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांनी दाखवून दिली आहे.
मा. बाळासाहेबांच्या ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रांनी इतिहास घडविला. या ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रांनी मराठी माणूस खाडकन जागा झाला आणि त्यातून अन्यायाचा मुकाबला करणारी, लोकांचे प्रश्न सोडविणारी ‘शिवसेना’ उभी राहिली.
ही व्यंगचित्रांची ताकद जगातील अनेक नव्या, जुन्या नेत्यांनी ओळखली आहे. सत्ताधाऱयांवर रिमोट ठेवण्याची ताकद या व्यंगचित्रकलेत आहे. स्टालिन, मुसोलिनी, हिटलर, गांधीजी, नेहरू सगळय़ा नेत्यांनी या व्यंगचित्रकलेची ताकद ओळखली होती. आताच्या ममता बानर्जी किंवा अन्य नेत्यांनी म्हणूनच व्यंगचित्रकारांना जेलची हवा खायला पाठविलं होतं.
रशियातल्या स्टालिनचा आवडता व्यंगचित्रकार बोरिस एफिमोव्ह होता. तो 107 वर्षांपर्यंत काम करत होता. स्टालिन त्याची व्यंगचित्र आपल्या कार्यालयात, स्वतःच्या खुर्चीमागे फ्रेम करून लावत असे. हिटलर स्वतः चित्रकार होता. त्यामुळे तो चित्रकला, व्यंगचित्रकलेची ताकद ओळखत होता. म्हणून जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार डेव्हिड लोला महायुद्धाच्या वेळी जेव्हा हिटलरवर राजकीय व्यंगचित्रे काढत होता, त्या वेळी हिटलरने संतापून डेव्हिड लोला याला पकडून आणण्याचं वारंट काढलं होतं. इतका डेव्हिड लोलाच्या व्यंगचित्रांनी हिटलर हैराण झाला होता.
महात्मा गांधी लंडनला गोलमेज परिषदेसाठी गेले होते, त्यावेळी ते एका खास खोलीत फक्त एकटय़ा डेव्हिड लोला याला भेटले होते आणि त्याच्याशी व्यंगचित्रविषयक गप्पा मारल्या होत्या. डेव्हिडला महात्मा गांधी गंमतीने म्हणाले, “माझ्यासोबत माझ्या बकरीचंही व्यंगचित्र काढत जा.”
‘शंकर्स विकली’ हे मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकासारखंच गाजलेलं व्यंगचित्र नियतकालिक! त्या साप्ताहिकाचे संपादक, व्यंगचित्रकार शंकर पिल्लई यांना पंडित नेहरू म्हणाले होते, “शंकर, मी जरी तुमचा मित्र असलो तरी माझ्यावरही व्यंगचित्रांतून तुम्ही फटके मारत जा.”
अशी आहे ही थोरा-मोठय़ांना मोहित करणारी व्यंगचित्रकला! ‘मार्मिक’ साप्ताहिकाने अनेक तरुण व्यंगचित्रकार घडविले. त्यांना प्रसिद्धी दिली आणि हे आजतागायत चालू आहे.
5 आणि 6 मे 2024 रोजी साहित्य मंदिर, सेक्टर 6, वाशी, नवी मुंबई येथे जवळपास 94 व्यंगचित्रकारांची विविध शैलीची व्यंगचित्र रसिकांना सकाळी 10 ते 7 या वेळेत पाहता येणार आहेत. त्याचप्रमाणे व्यंगचित्रकार होण्यासाठी काय गुण लागतात, काय करावं लागतं याविषयी नामवंत व्यंगचित्रकार प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. साऱया जगात व्यंगचित्रकलेचं स्थान काय आहे, देशात व्यंगचित्रकलेची काय परिस्थिती आहे, अशा विविध विषयांवर जगभरात गाजलेले व्यंगचित्रकार व्यासपीठावरून बोलणार आहेत.
व्यंगचित्र या विषयाचा संपूर्ण धांडोळा घेणारा हा ‘कार्टून महोत्सव’ आहे. या दोन दिवसांत जग गाजविणारी अनेक ऐतिहासिक व्यंगचित्रेही या वेळी पाहता येतील. व्यंगचित्र रसिकांसाठी मेजवानी आहे.
कार्टुनिस्टस् कंबाईन ही संस्था विविध शहरांतून असे कार्यक्रम, उपक्रम करून व्यंगचित्रकला टिकवून ठेवण्याचे काम करीत आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकारांना भेटणे, त्यांच्याशी व्यंगचित्रविषयक गप्पा मारणे, मार्गदर्शन घेणे, त्यांची काम करण्याची पद्धत पाहता येणे अशा अनेक गोष्टींचा फायदा अशा ‘कार्टून महोत्सव’ला येण्यामुळे होतो.
नवनवीन व्यंगचित्रकार तयार झाले तर समाजातील दोषांवर टीका करून, समाज सुधारण्याचं काम आपोआप होतं आणि हे मा. बाळासाहेब यांच्या शेकडो व्यंगचित्रांनी दाखवून दिलं आहे. मा. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी अनेक प्रश्न सोडविले आहेत. ही या कलेची ताकद आहे. ही कला तरुणांनी पुढे न्यावी म्हणून मा. बाळासाहेब यांनी ‘कार्टुनिस्टस् कंबाईन’ या संस्थेची स्थापना केली.
मा. बाळासाहेबांच्या ‘मार्मिक’ने घडविलेले व्यंगचित्रकार देश घडविण्याचं काम आपल्या बोलक्या व्यंगचित्रांतून करतील याची ग्वाही आपल्याला या प्रदर्शनातील व्यंगचित्रे पाहून येईलच.
कमीत कमी रेषांत, कमीत कमी शब्दांत बोलणाऱया या व्यंगचित्रकलेविषयी हजारो शब्दांत लिहिलं तरी ते कमीच होईल. त्यासाठी एखादं शब्दविरहित व्यंगचित्रच रेखाटावं लागेल.
(अध्यक्ष, कार्टुनिस्टस् कंबाईन,
अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संस्था)
[email protected]