निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात भाजपा एक्सपोज होत चाललीय; परिवर्तन होणार, आदित्य ठाकरे यांचा विश्वास

रणरणत्या उन्हातही तुम्ही इथे आशीर्वाद द्यायला आलात. आम्ही तुमच्या सोबत आहोत, हेच इथली जनता सांगतेय. असंच चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी आपल्यासमोर एक चित्र उभं केलं जात होतं ते, म्हणजे ‘अब की बार 400 पार’. लोकसभा निवडणूक जशी सुरू झाली आणि प्रत्येक टप्पा जसा पार पडत चालला आहे, पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला आता तिसरा टप्पा येईल. भाजपा एक्सपोज होत चालली आहे. आणि 400 पार काय, हे 200 तरी पोहोचतील का? हा प्रश्न देशात सर्वच विचारत आहेत, असं म्हणत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी घणाघात केला. महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदवार अनंत गिते यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांची खणखणीत सभा झाली. रायगड लोकसभा मतदारसंघात मुरुडमध्ये आदित्य ठाकरे यांची प्रचार सभा घेण्यात आली.

एनडीएमध्ये म्हणजे महायुतीत कोण-कोण आहे? भाजप, ईडी, आयटी, सीबीआय, मिंधे गट, फुटलेली राष्ट्रवादी आहे. महाविकास आघाडीला किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मत देऊ नका, असं हे सगळे तुम्हाला येऊन सांगतील. कारण आमचे चारशे येणार आहेत, तुमचं मत कशाला फुकट घालवताहेत, असं म्हणतील. पण हे चारशे येणार कुठून हे पहिलं तुम्ही सांगा? असा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. कारण आज देशात परिवर्तनाचं चित्र आहे. काँग्रेसचा एक नारा आहे, भाजपा साउथ से साफ नॉर्थ मे हाफ, हे आता खरं होताना दिसत आहे. दक्षिण भारतात एकही असं राज्य नाही तिथे भाजपचे एक दोन सोडून जास्त खासदार निवडून येऊ शकतात. केरळ, तामिळनाडू, आंध्र, तेलंगण आणि कर्नाटकातही निवडणून येणार नाही. उत्तर भारत आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमधून रिपोर्ट येत आहे. आयबीचा रिपोर्ट येतोय, सर्व्हे येत आहेत. हे सगळे सांगताहेत वेगळं काहीतरी घडतंय. दहा वर्षांनंतर परिवर्तन होणार म्हणजे होणार आणि हमखासपणे इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत बसणार, हे वारे आता वाहू लागले आहेत, असा ठाम विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

लडाखला राज्य बनवणार त्यांना केंद्र शासित प्रदेश केलं गेलं. त्या केंद्र शासित लडाखमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ झाला, निवडणुका झालेल्या नाहीत. मुख्यमंत्रीपदाची निवडणूक झाली नाही. राज्य बनवत नाहीत. लडाखी लोक आज रस्त्यावर उतरले आहेत. तिथे उमेदवार सापडत नसल्याने भाजपची नामुष्की झाली आहे. भाजप खासदारने जनतेत जाऊन माफी मागितली आहे. भाजपसाठी प्रचार केला होता, पण आता पुन्हा करणार नाही, असं त्या खासदाराने म्हटलं आहे. राजस्थान, उत्तर प्रदेशात अशीच स्थिती आहे. उत्तर प्रदेशात भाजपला 54-55 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. देशात हे सध्याचं चित्र असताना तुम्ही 400 पार आणताय कुठून? कदाचित अमेरिकेतून, दुसऱ्या देशातून किंवा चंद्रावरून तुम्हाला 400 येऊ शकतात. पण देशात 400 काय 200 ही जागा भाजपच्या येणार नाहीत. महाराष्ट्रातही जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी जिंकणारच, असं Aaditya Thackeray म्हणाले.

आधी मोदी सरकार बोलायचे, मग भाजप सरकार म्हणायला लागले. आता एनडीएचं सरकार म्हणत आहेत. आता त्यांना मित्रपक्ष आठवत आहेत. आता उद्धवसाहेबांबद्दल प्रेम आठवत आहे. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. पण गेली दोन अडीच वर्षे महाराष्ट्राचा जो छळ चालला होता, महाराष्ट्रावर जो अन्याय चालला होता, तोच अन्याय रोखायला आणि बदलायला आपण या लढाईत पुन्हा आलो आहोत. ही लढाई फार महत्त्वाची आहे. ही लढाई देश विरुद्ध भाजप, लोकशाही विरुद्ध भाजप, संविधान विरुद्ध भाजप अशी होत चालली आहे. कोणाच्या बाजूने उभं राहायचं आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. ही लढाईल आता प्रत्येकाची झाली आहे. कोण पंतप्रधान होणार? याची ही लढाई नाही. लढाई तुम्ही कोणाला मतदान करणार? गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी तुम्ही काय नक्की निवडणार आहात, याची ही लढाई आहे, असं आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.

गेल्या 10 वर्षांत काय विकासकामं केली, यावर भाजप नेते आता प्रचारात बोलत नाहीत. त्यांचा प्रचार आता विरोधी पक्ष काय खातं, काय घालतं, काय बोलतं यावर होत आहे. जिथे-जिथे भाजपा हारतेय तिथे-तिथे पहिलं इंडिकेटर म्हणजे दोन धर्मात वाद निर्माण करतात. मग जातीत वाद निर्माण करतात. मग जिल्ह्या-जिल्ह्यात वाद निर्माण करतात. आता तर मटण, मांस, मच्छी यावरही बोलताहेत. रायगडमध्ये मच्छी नाही खायची तर मग काय खायचं? तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि काय नको, हे तुमच्या घरात घुसून भाजप सांगणारा कोण? गेली 10 वर्षे तुम्ही सरकार चालवलं, त्यांनी मटण मास, मच्छीवर बोलावं का? त्यांनी हिंदू-मुस्लिमवर बोलावं का? जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करावा का? हिंमत असेल तर येऊन आमच्यासोबत चर्चा करा, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं.

2016 मध्ये तुम्ही नोटबंदी आणली होती. डिमॉनिटायझेशन केलं होतं. लोक रांगेत उभी होती. बँकांसमोर उन्हात उभं राहून अनेक लोकांचा मृत्यू झाला. पण तो काळापैसा, त्या नोटांचं काय झालं? हे कोणालाच माहिती नाही. या नोटबंदीचा फायदा जनतेला झाला नाही. आता असं ऐकण्यात येत आहे, पुन्हा एकदा नोटबंदी आणण्यात येईल. ज्या उरलेल्या नोटा आहेत, त्याही बंद करतील. म्हणजे भाजपच्याच चेहऱ्याच्या नोटा छापून तुमच्या हातात येतील. ज्या नोटा लोकांकडे आहेत, त्याही बंद करतील की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

प्रज्ज्वल रेवन्ना… लाज वाटते त्याचं नाव घ्यायला. अनेकांवर त्यांनी बलात्कार केला आहे. त्याने ‘मास रेप’ केले आहेत. विदेशातून पळून गेला. विरोधी पक्षातले नेते असले की ईडी, सीबीआय मागे लागते. त्यांना जगभरातून आणता येऊ शकतं. तसं आज रेवन्नाच्या मागे केंद्र सरकार का लागलं नाही? फक्त जेडीएसचे आहे किंवा एनडीएचे आहेत किंवा भाजप नेत्यांनी जाऊन त्यांचा प्रचार केला होता, म्हणून तुम्ही त्यांना परत आणत नाहीत का? महिलांच्या असुरक्षिततेची ही परिस्थिती संपूर्ण देशात झाली आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.