खासदार सुजय विखे तुमच्या आमच्यासाठी नव्हे तर त्यांच्या स्वार्थासाठी लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. आमदार नीलेश लंकेंनी विखे कुटुंबाची पळता भुई थोडी केली आहे. त्यांनी सर्वसामान्यांच्या जिवावर गेल्या पन्नास वर्षांत जमा केलेली धनसंपत्ती ते आता बाहेर काढतील, भूलथापा मारतील. विखे कुटुंबाच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावती घोगरे यांनी केले.
नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ चिचोंडी पाटील आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत घोगरे बोलत होत्या. निवडणूक एकतर्फी नाही ही जमेची बाजू असून नीलेश लंके देत असलेली टक्कर ही वाखाण्याजोगी गोष्ट आहे.त्यामुळे प्रवरेच्या कुठल्याही भुलथापांना बळी न पडता लंके यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहण्याचे आवाहन श्रीमती घोगरे यांनी केले.
पाच वर्षांपूर्वी, मागच्या निवडणुकीत साकळाईचे पाणी आणतो असे म्हणाले होते. त्यांनी आणले का पाणी ? ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुमच्या आमच्यासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी उभे आहेत. स्वतःचे अस्तित्व टिकले पाहिजे, स्वतः मोठे झाले पाहिजे हेच विखे कुटूंबाचे राजकारण असल्याची घणाघाती टीका घोगरे यांनी केली. घोगरे पुढे म्हणाल्या, स्थानिक असलेले नीलेश लंके यांना कधीही फोन करा ते तुमच्यासाठी रात्री अपरात्रीही धावत येतील. आमचे प्रवरेचे पाहुणे तुमच्या रस्त्याला कधी येतील ? कधी तुम्ही फोन करणार ? शिवाय नगर-मनमाड हायवे इतका जोरात आहे की त्यांना येण्यासाठी कीती तास लागतील ? घरचा, स्थानिक तो स्थानिक असतो.
घोगरे पुढे म्हणाल्या, प्रवरा भागात अतिशय दबाव तंत्राचा, हुकूमशाहीचा वापर करण्यात येतो. आम्ही ज्यावेळी सोसायटी व ग्रामपंचायत निवडणूक जिंकलो त्यावेळी आमच्या गावातील प्रत्येक नागरीकावर बारीक लक्ष ठेण्यात येते. आम्ही कुठे बसतो, संध्याकाळच्या वेळेस आमच्या घरातील कुटुंबीय एखाद्या दुकानात बसले तर लगेच त्यांना निरोप येतो. तुझ्या दुकानात कसे बसले ? तुझे दुकान बंद करतो. गावात कुठे उठ बस करायची हे ठरवण्याचा अधिकार लोकशाहीने त्यांना दिला आहे का असा सवाल घोगरे यांनी केला.