मोदींचं सरकार हे गझनी सरकार असून मोदींनी आता गाईवर बोलतात तसं महागाईवर बोललं पाहिजे. चाय पे चर्चा करता, तसं मुद्द्यांवरही चर्चा केली पाहिजे, असं थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातकणंगलेतून केलं. महाविकास आघाडीचे हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.
महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना वंदन करून त्यांनी महाराष्ट्र लुटणाऱ्यांवर हल्लाबोल केला. ‘आज महाराष्ट्र दिन आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा संपूर्ण महाराष्ट्राने दिला, रक्त सांडलं, हुतात्मे दिले त्या संघर्षाची यशोगाथा सांगणारा आजचा दिवस आहे. म्हणून सर्वप्रथम मी त्या हुतात्म्यांना मी वंदन करतो. मध्यरात्री मी त्यांना वंदन करून एक शपथ घेतली आहे. तुम्ही घेणार की नाही, हा तुमचा प्रश्न आहे. कारण त्यावेळी जे हुतात्मे झाले तो आकडा 105 आहे. पण ताया झिंकीन या महिला पत्रकाराने रुग्णालयात दोन ते अडीचशे मृतदेह पडल्याचं नमूद केलं आहे. मोरारजी देसाईंनी गोळीबाराचे आदेश दिले होते. माणसांना मारण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मराठी माणसं मेली तरी चालतील पण गोळी वाया जाता कामा नये. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली होती. आता सूरतेचे दोन जण महाराष्ट्र लुटताहेत. मी शपथ घेतली आहे की महाराष्ट्राला लुटणाऱ्या लुटारूंचा सुपडा साफ केल्याशिवाय मी राहणार नाही. महाराष्ट्राला जे लुबाडताहेत, ओरबाडताहेत त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलो आहे. डोळ्यांदेखत महाराष्ट्र लुटणारे हे वखवखणारे आत्मे महाराष्ट्रातच मत मागायला फिरू कसे शकतात? ‘ असा रोखठोक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
‘मी तुमची माफी मागतो कारण मागच्यावेळी मीच तुम्हाला सांगितलं होतं. मला वाटलं नावासारखा असेल पण इतकं धैर्य हरणारा माणूस मी नव्हता पाहिला. पण गद्दारी माझ्याशी झालेली नाही. हा तर खोकेबाज निघालाच पण ज्या मोदींसाठी मी मतं मागितली होती, त्या मोदी सरकारने महाराष्ट्राशी द्रोह केलाय, गद्दारी केली. माझ्यासोबत इथे असणाऱ्यांचा पराभव जाणूनबुजून केला गेला. हे भाजपवाले इतके नालायक आहेत. संपूर्ण देशात भाजपला कुणी जवळ घेत नसताना शिवसेनेने खांद्यावर बसवून महाराष्ट्र दाखवला. नाहीतर तुम्हाला खांदा द्यायला आज महाराष्ट्रात माणूस दिसला नसता. पण तुम्ही माझ्या शिवसैनिकांचा वापर केला आणि शिवसेनेच्या निवडणुकीत पाडापाडीचे धंदे केले. मी याचा सूड घ्यायला आलोय.’
‘सर्वोच्च न्यायालयाने इथल्या लवादाचं कानफाट फोडलं. मला गादीवरून खेचून स्वतः उडी मारून बसले. त्यांची पोरटोरं बसलेली चालतील. पण शिवसेनाप्रमुखांचा पुत्र बसला तर त्याने बसायचं नाही. ज्या घराण्याने यांना सगळं दिलं त्यांना तुम्ही खाली खेचलं. हे सगळे गद्दार तर आहेतच पण या गद्दारांचे दोन बाप जे दिल्लीत बसलेत तेही महाराष्ट्राचे गद्दार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणात लिहिलं आहे की राज्यपालांनी चुकीचं काम केलं आहे. मी नेहमी त्यांना कोश्यारी म्हणतो. कारण राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्या पदाचा अपमान होऊ नये ही जबाबदारी त्यांची होती. दिल्लीतल्या मालकांनी आदेश दिल्याप्रमाणे ते वागले. अजूनही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही. लवाद आणि निवडणूक आयोग यांचे घरगडी आहेत. त्यांनी मालकांनी सांगितल्याप्रमाणे निकाल दिला. पंतप्रधान नकली सेना म्हणताना सर्वोच्च न्यायालयावर दबाव, दडपण आणताहेत, हा मी जाहीर आरोप करतो. यालाच हुकूमशाही म्हणतात. मी सर्वोच्च न्यायालयाला जाहीर विनंती करतो की तुम्ही अजून निकाल दिलेला नाही. तुम्ही वेळोवेळी कसं चुकलं आहे, हे सांगितलं आहे. असं असूनही पंतप्रधान पदावर बसलेला एक माणूस माझ्या सेनेला नकली सेना म्हणतोय म्हणजे तो तुमच्यावर दडपण आणतोय. या माणसाला आवरा. हे दबावाचं राजकारण आहे. मधल्या काळात न्यायव्यवस्थाही हातात घेत होते. बाकी कुणी विकले गेले असले तरी अजून सर्वोच्च न्यायालय विकलं गेलेलं नाही, याचा मला अभिमान आहे. ‘
‘न्यायमूर्तींवर तुम्ही दडपण आणताय, पक्ष कुणाचा हे ठरवताय. तुम्हाला महाराष्ट्राविषयी काय माहितीये मोदीजी? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे अग्रणी होते. आमचं घराणं, आमच्या पिढ्या महाराष्ट्राशी समरस झालेल्या आहेत. आज माझा पक्ष चिन्ह काढून घेतलंत तरी माझ्यावर प्रेम करणारे लाखो लोकं माझ्यासोबत आहेत. हे माझ्या वाडवडिलांचं पुण्य आहे. आज उद्धव ठाकरे यांना किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे. मुंबईसाठी अख्खा महाराष्ट्र पेटला होता. जसं आता शेतकऱ्यांवर ड्रोन सोडले. तसं मोरारजींचे नरराक्षस पोलीस चाळींमध्ये जाऊन अश्रुधूर सोडायचे. चाळीची वस्ती, त्यातील महिला, त्यातली काहींची तान्ही बाळं गुदमरायला लागली. तेव्हा त्या रणरागिणी पोलिसांसमोर उभ्या ठाकल्या आणि म्हणाल्या की आम्ही मरू पण मुंबई देणार नाही… अशा त्वेषातून आणि चिडीतून ही मुंबई आपण घेतली आहे. हे दोन ठोकळेबाज आता तिचं महत्त्व मारायला निघाले आहेत.’
मोदींच्या जुमलेबाजीवरही उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला. मोदींनी आता फालतू गप्पा करणं थांबवाव. हे मोदी सरकार नाही, हे गझनी सरकार आहे. त्यांना काल काय बोललो ते आज आठवत नाही. उद्या लोकंच तुम्हाला विसरणार आहेत. आता मोदी फुटबॉल या खेळासारखं सेल्फ गोल करताहेत. आधी ते म्हणाले अबकी बार चारसौ पार. मग घराणे शाही काढली. आता लोकांचं खाणं काढलं. मोदी, गायीवर बोलता ना, आता महागाईवर बोला. चाय पे चर्चा करता तशी मुद्द्यांवर चर्चा करा, असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.