धाराशिव आणि लातूर येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंजापुराण’ वाचले. महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीचा आशीर्वाद मोदींनी मागितला पण दर्शनाला जाण्याचे मात्र टाळले. दहा वर्षांत आपल्या सरकारने काय केले याबद्दल मिठाची गुळणी धरून मोदींनी काँग्रेसवरच टीकेची झोड उठवली. ‘आदर्श डीलर’ अशोक चव्हाण, विमान खरेदीतील गैरव्यवहाराचा कलंक घेऊन फिरणारे प्रफुल्ल पटेल यांच्या साक्षीने त्यांनी भ्रष्टाचार विरोधाची रेकॉर्ड वाजवली. सिंचन, जलयुक्त शिवारची कामे भाजप सरकारने केल्याची थाप मारतानाच त्यांनी सोयाबीन उत्पादकांना अच्छे दिन आल्याचा दावाही केला.
धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील आणि लातूर येथील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा झाल्या. दोन्ही सभांमध्ये मोदी यांनी काँग्रेसवरच टीका केली. काँग्रेस सत्तेत आल्यास तुमची बचत, दागदागिने, घर, संपत्ती ताब्यात घेऊन त्यांच्या मतपेढीला देणार आहे, असे मोदी म्हणाले. गेली साठ वर्षे काँग्रेसने मराठवाड्याचा केवळ विश्वासघातच केल्याचा आरोपही त्यांनी केला. धाराशिव जिल्ह्यातील शेतकर्यांना पंतप्रधान सन्मान निधीतून 800 कोटी रुपयांची मदत करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
सिंचन, जलयुक्तची कामे आम्हीच केली
काँग्रेसने सिंचनक्षेत्रात कवडीचेही काम केले नाही. गेल्या दहा वर्षांत आम्ही शेतकर्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवले. जलयुक्त शिवारमध्ये आम्ही जे काम केले ते सर्वांसमोर आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. सिंचन क्षेत्रातील भाजपच्या कामाचा उल्लेख करताना पंतप्रधान ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा मात्र विसरले. जलयुक्त शिवारचा एकही चर सध्या अस्तित्वात नाही. धाराशिव जिल्ह्याचे अनेक वर्षे नेतृत्व करणारे डॉ. पद्मसिंह पाटील हे अनेक वर्षे जलयुक्तच्या माध्यमातून किती पाणीसाठा झाला याचे उत्तर कोणाकडेही नाही. पण मोदींनी थापेबाजी करून वेळ मारून नेली.
जिन्होने लुटा है, उनको लौटाना पडेगा
भ्रष्टाचाराच्या विरोधात राणा भीमदेवी थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जिन्होनो लुटा है, उनको लौटाना पडेगा’ अशी गर्जना केली. यावेळी धाराशिवात त्यांच्या व्यासपीठावर भ्रष्टाचाराचा आरोप असलेले प्रफुल्ल पटेल तर लातुरात अशोक चव्हाण हे उपस्थित होते.
लातूरचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची थाप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारली. लातूरला पाणीदार करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. लातूर हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आता तो महायुतीचा बालेकिल्ला बनल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मराठवाडा वॉटर ग्रीड आणि जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.
तुळजाभवानीचा आशीर्वाद मागितला, पण दर्शनाला जाण्याचे टाळले
सोलापूर येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी धाराशिवला येतच आहेत तर त्यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीचे दर्शन घ्यावे, असे आव्हान दिले होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन’ अशी करावी असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात तुळजाभवानीचे नाव घेऊन केली, पण ते तुळजाभवानीच्या दर्शनाला मात्र गेले नाहीत. मोदींच्या दर्शनाला न जाण्यामुळे महाराष्ट्राबद्दल आणि भवानीमातेबद्दल आकस असल्याची चर्चा सभास्थळी रंगली होती.