लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी हे कोल्हापुरात प्रचार सभा घेत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसात महाराष्ट्रात सहा प्रचार सभा होणार आहेत, याचा खरपूस समाचार शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी घेतला. छत्रपतींच्या गादीपुढे मोदी कुणी नाहीत, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.
‘महाराष्ट्रात आणि देशात दलित, शोषित, पीडित यांना जीवनामध्ये ताकद देण्यासाठी छत्रपती शाहूंनी योगदान दिलं. ज्या शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिला, जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी कोल्हापुरात येताहेत हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही, थोडं आश्चर्य वाटलं’, असा घणाघात खासदार Sanjay Raut यांनी केला.
‘श्रीमंत छत्रपती शाहू आणि त्या गादीचे त्यांच्या आधीचे सगळे वारसदार यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठं योगदान दिलेलं आहे. तरीही भाजपने किंवा त्यांच्या बरोबरच्या लोकांनी ज्यांनी तिकीट घेतलंय त्यांनी उमेदवार उभा करणंचं चुकीचं आहे. आमची इच्छा होती की छत्रपती शाहूंना बिनविरोध निवडून द्यावं. आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे शाहू, फुले, आंबेडकरांची त्या परंपरेचा सन्मान करावा. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती. तरीही छत्रपती शाहू महाराज उभे राहताहेत म्हटल्यावर ती जागा आम्ही त्यांच्यासाठी सोडली. पण भाजपतर्फे नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येताहेत, हे महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही’, असा इशारा संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींना दिला.
‘छत्रपतींच्या गादीपुढे मोदी कुणी नाहीत. कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाही. मोदी बसतात ती गादी नाही, ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे. भाजप त्या गादीचा अपमान करतंय. मानही गादीला आणि मतही गादीलाच आहे, ही कोल्हापूरकरांची घोषणा आहे. मोदी आणि त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात पूर्ण कार्यक्रम करायचा हे कोल्हापूरचं ठरलंय’, असा भीमटोला संजय राऊत यांनी लगावला.
‘तुमचा संबंध काय ‘जय भवानी, जय शिवाजी’शी?’
‘जे मोदी कोल्हापुरात छत्रपती शाहूंचा पराभव करण्यासाठी येऊ शकतात, त्या गादीची घोषणा ही ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी आहे. त्या गादीचा सन्मान, शिवाजी महाराजांचा सन्मान आहे. शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा आम्ही देतो. भवानी माता ही छत्रपतींची कुलदेवता, महाराष्ट्राची कुलदेवता आहे. त्या कुलदेवतेवर आणि शिवाजी महाराजांवर आघात करताय. परत शिवाजी महाराजांच्या गादीच्या विरोधात म्हणजेच प्रत्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहूंच्या प्रचाराला येताहेत. त्यामुळे ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही आमची घोषणा ती प्रचाराची घोषणा नाही. आम्ही त्या घोषणेवर मतं मागत नाही. गेल्या अनेक पिढ्या छत्रपती शिवकालापासून ही घोषणा महाराष्ट्रात दिली जाते. यावर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कंपनीचं काय म्हणणं आहे? हे त्यांनी सांगावं. नुसते बेंबीच्या देठापासून ओरडताहेत ‘जय भवानी, जय शिवाजी’. तुमचा संबंध काय ‘जय भवानी, जय शिवाजी’शी?, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला.
हातात ‘मशाल’ घेऊन मोदी शहांची लंका जाळा, संजय राऊतांचा शंखनाद
‘महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अडवणूक, हेच मोदींचं धोरण’
‘गुजरातचा 2000 मेट्रीक टन कांदा हा मुंबईच्याच न्हावा-शेवा बंदरातून परदेशात जाणार आहे. ऐन निडणुकीत गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे. ही लाच आहे. महाराष्ट्राचा कांदा हा सडवला जातोय. त्याला भाव नाही. तिथे तुम्ही निर्यातबंदी केली. कांदा उत्पादक, दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळताहेत म्हटल्यावर तुम्ही ताबडतोब निर्यातबंदी करताय. पण गुजरातचा व्यापारी महाराष्ट्रात येतो, कंदा खरेदी करतो आणि तो गुजरातला जातो. तिथून हा कांदा आता निर्यातबंदी उठवल्यामुळे परदेशात नेणार. म्हणजे गुजरातचा पांढरा कांदा हा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्राचा कांदा हा रस्त्यावर फेका, महाराष्ट्राचा कांदा सडवा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अडवणूक करा, हेच मोदींचं धोरण आहे’, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
‘शरद पवारसाहेबांनी आजच एक उदाहरण दिलं. महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या गुरांसाठी गुजरातच्या अमूल डेअरीने इथे चारा पाठवला. म्हणून नरेंद्र मोदींनी अमूलच्या संचालकांवर गुन्हे दाखल करून खटले चालवलेत. हा मोदींचा महाराष्ट्र द्वेष आहे. महाराष्ट्रातला शेतकरी, गुरं जनावरं हे तडफडून मेले पाहिजेत, असं मोदी आणि शहांना वाटतंय. गुजरातच्या कांदा निर्यातबंदी उठवण्यामागची भूमिकाही तीच आहे. महाराष्ट्रातला शेतकरी तडफडत मेला पाहिजे, मात्र गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाही तर गुजरातचे पंतप्रधान आहेत’, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.
‘अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या जाहीरनाम्याचा उपयोग नाही’
‘कोण शेतकऱ्याचा मुलगा? महाराष्ट्रातल्या साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या मुलांना या शेतकऱ्याच्या मुलाप्रमाणे 2000 एकर जमीन द्या आणि शेतात जाण्यासाठी पाच-पाच हेलिकॉप्टर्स द्या’, असं आव्हान संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.
‘अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या जाहीरनाम्याचा उपयोग नाहीये. कारण दोन्ही गटांचा एकही खासदार निवडून येणार नाही, हे वारंवार मी सांगतोय. अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही आणि शिंदे यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो. काल ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात होते. प्रचाराला कुठे दिसले नाहीत. पण विमानातून बरच काही सामान आलं, वेगळ्या पद्धतीचं प्रचार साहित्य, असं लोक सांगतात. याची तिथे फार चर्चा होती. निवडणूक आयोग काय करतोय? निरीक्ष काय करताहेत? त्यांची सगळी मदार ही पैश वाटपावर आहे. मतांवर नाही, प्रचारावर नाही, विचारांवरही नाही. त्यामुळे जाहीरनामा करून त्यांना काय करायचंय? त्यांना जाहीरनामा कळतो का? टीका करण्यापेक्षा आधी लिहा-वाचायला शिका, असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर टीका करणाऱ्यांना दिलं.