राम हा अयोध्येतल्या शेतकरी – कष्टकऱ्यांचाही राजा होता. एकिकडे अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा करणाऱ्यांनी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकले. तेव्हा आता हातात ‘मशाल’ घेऊन मोदी शहांची लंका जाळावीच लागेल, असं आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केलं. अकोले येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत राऊत बोलत होते.
मोदींच्या महाराष्ट्रद्वेषाचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, या भागात अनेक मोठ्या चळवळी, संघर्ष झाले. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन होण्याआधी इथे पुणतांब्याला मोठं आंदोलन झालं. सगळ्यात मोठं आंदोलन म्हणजे शेतकरी संपावर गेला. या आंदोलनाने देशाचं लक्ष वेधून घेतलं. शेतकऱ्याचं लक्ष प्रश्न समजून घघेतले. या अशा भागामध्ये भाषण करणं, विचार मांडणं, आपल्याशी संवाद साधणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या भागामध्ये फार मोठा इतिहास, परंपरा आहे. ही परंपरा लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या माणसांची आहे. ज्या भागामध्ये डावी चळवळ असते, तो भाग आदिवासी, कष्टकरी, गरीब शेतकऱ्यांचा असतो. या भागात सातत्याने ही चळवळ मला दिसते. हे सगळे लोक दिल्लीच्या सीमेवर ऊन पाऊस वारा थंडी यांना न जुमानता बसले होते. तिथे पोहोचलेला राजकीय नेता मी असेन. त्याचं कारण असं की हा महाराष्ट्र अशा प्रकारच्या देशाच्या लढ्यात सदैव प्रामाणिकपणे पुढे असतो. म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्राला घाबरतात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. गेल्या महिन्याभरात नरेंद्र मोदी जवळपास 17 वेळा महाराष्ट्रात आले, अमित शहा जवळपास रोज महाराष्ट्रात येताहेत. कारण त्यांना या महाराष्ट्राची भीती वाटतेय. आपली सत्ता उलथून टाकण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे आणि एकदा इथे ठिणगी पडली की त्याचा वणवा अख्ख्या देशात पेटतो आणि आता तर मशाल पेटली आहे. मी तर अमित शहा यांना जाहीरपणे सांगितलं होतं की, तुम्ही ज्या शाळेत शिकलात त्या शाळेचा मुख्यध्यापक मी आहे. मराठी माणसाला, महाराष्ट्राला देशभक्ती, संघर्ष, हिंदुत्व तुम्ही शिकवू नका. तुम्ही सगळे आयत्या बिळावरचे नागोबा आहात. या देशाची जमीन तयार करण्याचं काम महाराष्ट्राने केलं आहे. नरेंद्र मोदींचं, अमित शहांचं हा देश उभा करण्यात काय योगदान आहे? असा रोखठोक सवाल राऊत यांनी यावेळी केला.
मोदी सरकारच्या गुजरातधार्जिण्या धोरणावरही त्यांनी कडाडून टीका केली. राऊत म्हणाले की, आपण मघाशी कांदा निर्यातबंदीचा उल्लेख केला. गरीब शेतकऱ्याला दूध आणि कांद्यावर पैसे मिळायला लागले की निर्यातबंदी येते. ही निर्यातबंदी गुजरातसाठी नाही. गुजरातचा 2 हजार टन पांढरा कांद्यासाठी मोदींनी निर्यातबंदी उठवली कारण त्यांना गुजरातच्या 25 जागा जिंकायच्या आहेत. पण महाराष्ट्रात 48 जागा आहेत, हे लक्षात घ्या. हा कांदा न्हावा शेवा बंदरातून निर्यात होणार आहे. हा आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचा शेतकरी यात नाहीये. या राज्यातल्या शेतकऱ्याचं दुःख मोदी शहांना कळणार नाही. त्यांना गुजरात म्हणजेच देश आहे आणि मी गुजरातचा पंतप्रधान आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र लुटून सर्वकाही गुजरातमध्ये नेलं जातंय. गुजरातसाठी निर्यातबंदी उठली जाते, महाराष्ट्र किंवा देशासाठी नाही. आमच्या शेतकऱ्यांचा कांदा रस्त्यावर टाकावा लागला, प्रचंड नुकसान झालं. पण महाराष्ट्रात कांदा घेणारे सगळे ठेकेदार गुजरातचे आहेत. सगळे व्यापारी गुजरातचे आहेत. महाराष्ट्राला कंगाल करायचं, शेतकऱ्याला, मराठी माणसाला भिकारी करायचं, असं सुडाचं राजकारण महाराष्ट्राच्या बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा करताहेत. हा कुठलातरी सूड ते घेताहेत. त्यांचा महाराष्ट्रावर कुठलातरी राग आहे. महाराष्ट्रावर जे चाल करून आले, त्या सगळ्यांना आपण झोपवलेलं आहे. मोदी आणि शहा असं का वागताहेत, याचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. असा कोणताही इतिहास मोदी-शहांच्या गुजरातला नाही. त्यांना फारतर भूगोल असेल. या महाराष्ट्रात छत्रपती शिवराय जन्माला आले पण औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालाय. म्हणून तो गुजरात सातत्याने महाराष्ट्रावर चाल करून येतो. पण, औरंगजेबाचं थडगं आपण इथे बांधलं. आणि उद्या निवडणुकीत मोदी-शहांना हा महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक ऐतिहासिक आहे, क्रांतिकारी आहे, देशाचं भविष्य घडवणारी आहे. पुढल्या पिढीचं भविष्य घडवणारी आहे. आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचं आहे, मोदी घडवू शकत नाही. आपल्या देशाला महान पंतप्रधानांची परंपरा या देशाला लाभली आहे. याच देशात तुळशीत भांगेचं रोपटं निर्माण व्हावं, तसं हे रोज खोटं बोलणारे नरेंद्र मोदी लाभला. रोज कारस्थानं करणारे अमित शहा गृहमंत्री लाभले. यांना आपण उखडून फेकल्याशिवाय हा देश सचोटीच्या मार्गाने जाणार नाही, असं आवाहन राऊत यांनी केलं.
मोदींच्या काँग्रेस जाहीरनाम्याविषयी केलेल्या धादांत खोट्या विधानावरही त्यांनी आसूड ओढले. ‘देशातला जो पहिला टप्पा झाला त्यात महाराष्ट्रातल्या 5 जागा आहेत. या टप्प्यात झालेल्या 108 जागांपैकी बहुतांश जागांवर भाजपचा पराभव होतोय. महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या पाचही जागा आपण जिंकणार आहोत. आज दुसऱ्या टप्प्यातली जी निवडणूक होत आहे, त्यातही आपण आठही जागांवर आघाडीवर आहोत. नांदेडसुद्धा आपण जिंकतोय. पण पहिल्या टप्प्यात आपण हरतोय हे कळल्यावर नरेंद्र मोदींनी हिंदू-मुसलमान सुरू केलं. तरीच आम्ही म्हणतोय की हा आवडता खेळ कसा सुरू करत नाही? मोदी म्हणाले की, काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात असं म्हटलं की, आमची सत्ता आली की संपत्तीचं पुनर्वाटप करू आणि महिलांना उद्देशून म्हणतात की तुमच्या गळ्यातली मंगळसूत्रं सुद्धा मुस्लिमांना देतील, असं धादांत खोटं विधान आमच्या देशाचे पंतप्रधान करतात. जो आपल्या देशातल्या महिलांच्या मंगळसूत्राला हात घालतो, त्याचा पक्ष भाजप ही मंगळसूत्र चोरांची टोळी आहे. त्यांना मला सांगायचंय की महिलांची मंगळसूत्र तुमच्या दहा वर्षांच्या राज्यात धोक्यात आली. गेल्या दहा वर्षांत आमच्या माता-भगिनींना मंगळसूत्र गहाण ठेवावी लागली, विकावी लागली, त्यांचं बलिदान द्यावं लागलं, ते सत्तर वर्षांत कधी झालं नाही. तुम्ही नोटबंदी केलीत, तेव्हा महिलांना मंगळसूत्र विकून काही काळ आपलं घर चालवावं लागलं, नरेंद्र मोदी हे लक्षात घ्या. तुम्ही लॉकडाऊन केलंत अचानक. कारखाने बंद, उद्योग बंद केले, कर्ते लोक घरात बसले तेव्हा या देशातल्या महिलांना आपलं मंगळसूत्र विकून घर चालवावं लागलं. बेरोजगारीला कंटाळून आपल्या मुलांची फी भरण्यासाठी महिलांनी मंगळसूत्र विकलेलं आहे. शिक्षणासाठी, आरोग्यासाठी विकलंय. हजारो सैनिक गेल्या दहा वर्षांत सीमेवर शहीद झाले. त्या वीरपत्नींनी आपलं मंगळसूत्र या देशासाठी त्यागलं. याचा हिशोब कोण देणार? हिंदू-मुसलमान करण्यासाठी तुम्ही हिंदू संस्कृतीतलं पवित्र बंधन वापरता, तुम्ही कसले हिंदुत्ववादी? तुम्ही ढोंगी आहात. अशा ढोंगी हिंदुत्ववाद्यांना आपल्याला घरी बसवायचं आहे. ‘
‘अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा केली. उत्सव साजरा केला. पण रामाला हे काही आवडलं नाही. राम आयेंगे तो अंगना सजायेंगे और किसान आयेंगे तो रस्तेमें खिले बिझायेंगे, हे रामाला मान्य नाही. शेवटी राम हा सुद्धा कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा राजा होता, हे लक्षात घ्या. राम वनवासाला निघाला तेव्हा त्याला सोडण्यासाठी हजारो शेतकरी आले होते. राम जेव्हा वनवासातून परत आला, तेव्हासुद्धा त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्येतले शेतकरी-कष्टकरी तिथे हजर होते. त्या शेतकऱ्यांच्या वाटेत तुम्ही खिळे ठोकता , हे रामाला मान्य होईल? ज्या दिवशी शिवसेना फोडली आणि धनुष्यबाण रावणाच्या हातात दिला, त्या दिवशी रामाने धनुष्यबाण खाली ठेवला आणि हातात मशाल घेतली. धनुष्यबाणाचं काम संपलंय आता हातात मशाल घ्यावी लागेल आणि मोदी शहांची लंका जाळावी लागेल, हे अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशात निर्माण झालं आहे. ‘ असं राऊत यावेळी म्हणाले.