>> सत्यजित दुर्वेकर
जगभरातील पर्यटकांचे लाडके शहर असणारे आदर्श, स्मार्ट शहर म्हणून दुबईची ख्याती व मोहिनी आहे. वाळवंटी प्रदेशातील चमत्कार म्हणून दुबईचा उल्लेख केला जातो, परंतु थक्क करणाऱया विकासाच्या संकल्पना पूर्णत्वास नेताना नेहमीच निसर्गाचे दोहन केले जाते. परिणामी निसर्ग कधी ना कधी त्याचे प्रत्युत्तर देत असतो. अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे बुडालेली दुबई हा जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱया हवामान बदलांचा परिपाक असल्याचे मानले जात आहे. कारण या वेळी केवळ दुबईच नव्हे, तर संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीला पावसाचा तडाखा बसला आहे.
निसर्गावर मात करणं माणसाला कधीच शक्य झालं नाही, पण त्याचं अपरिमित शोषण करणं मात्र मानवी समूह अविरतपणाने करत आहे. भौतिकवादी आर्थिक विकासाच्या शर्यतीच्या मुळाशी निसर्गाचे जास्तीत जास्त शोषणच आहे. असे असूनही निसर्गात इतकी शक्ती आहे की, तो पृथ्वीवर राहणाऱया सर्व प्राण्यांच्या गरजा पूर्ण करू शकतो, परंतु महात्मा गांधी म्हणायचे त्याप्रमाणे मानवाची हाव किंवा लोभ पूर्ण करण्याची क्षमता निसर्गात नाही. हवामान बदल आणि ग्लोबल वार्ंमगचा जो आवाज आपण सतत ऐकत असतो तो मानवाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे अति शोषण करण्याच्या कृतीचा दुष्परिणाम आहे. त्यामुळे संपूर्ण निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे याची अनेक उदाहरणे देता येतील. औद्योगिकीकरणाच्या विकासापासून ते अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रापर्यंत मानवाने अंदाधुंद वैज्ञानिक हस्तक्षेप केला आहे. यामध्ये पृथ्वीवरील खनिज संपत्तीचे शोषण ते सोयीसुविधा शोधणाऱया उपकरणांच्या विस्तारापर्यंतचा समावेश आहे.
वस्तुतः निसर्गाचा समतोल वातावरणापासून ते जलस्रोतांपर्यंत आणि आकाशातील क्रियांवर अवलंबून असतो. साहजिकच, जेव्हा या सर्व स्रोतांमध्ये मर्यादेपलीकडे छेडछाड केली जाते तेव्हा निसर्ग प्रतिक्रिया देऊ शकतो आणि हवामान त्याचा पहिला बळी ठरू शकतो. या क्रमात विसंगतीही उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, वाळवंटी भागात पूर येऊ शकतो आणि समुद्र किनारे तहानलेले राहू शकतात. एल निनो नावाची हवामान बदलाची संकल्पना अधिक प्रबळ बनलेली दिसू शकते. उष्ण प्रदेश थंड होऊ शकतात आणि थंड भाग उबदार होऊ शकतात. हेच आज आपण जगभर पाहत आहोत. वातावरणातील याच बदलाच्या परिणामांशी आजचा माणूस झगडत असून विज्ञानाच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहे.
संयुक्त अरब अमिरातीसारख्या दुष्काळी आणि वाळवंटी प्रदेशातील जागतिक कीर्तीचे शहर असणाऱया दुबई शहरातील नुकतेच समोर आलेले पुराचे दृश्य या सर्वांची प्रचीती देणारे आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये मध्ये 15 एप्रिलच्या रोजी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी 160 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. याचाच अर्थ एक वर्षाचा पाऊस अवघ्या 24 तासांत झाला. केवळ पावसाचं पाणीच नाही, तर वादळी वाऱयासह पावसाने नवं संकट उभे केले आहे. अनेक शहरांत पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती, तर उंच इमारतींमधील रस्त्यांवर शेकडो वाहने अडकलेली पाहायला मिळाली. कधीकाळी दुबईच्या रस्त्यावर धावणाऱया महागडय़ा गाडय़ांऐवजी अचानक बोटी दिसून लागल्या होत्या.
अचानक बदललेल्या वातावरणाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही या देशात झालेल्या जोरदार पावसामुळे शास्त्रज्ञ आणि जग आश्चर्यचकित झाले आहे. दुबई जगातील सर्वात स्मार्ट शहरांपैकी एक आहे आणि आपल्या तीव्र तापमानासाठी दुबईला ओळखले जाते. जगभरातील पर्यटकांचे, सिने कलावंतांचे, धनिकांचे, तरुणांचे आवडते शहर असणाऱया दुबईतील रस्त्यांवर या अवकाळी पावसामुळे पाणी साचून त्यावर पार्क केलेली वाहने अर्धी पाण्यात बुडाली होती. तेथील चकचकीत मॉलमध्येही पाणी शिरले होते. घरे आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अनेक फूट पाणी शिरले. संपूर्ण शहरात वाहतूक काsंडी झाली. विशेष म्हणजे या शहरात कुठेही नदी नाही. तेथील सरकारने कृत्रिम तलाव आणि बर्फाळ ठिकाणे तयार केली आहेत, पण या सगळ्यांचे महत्त्व कवडीमोल झाले. कारण संपूर्ण शहर पूरग्रस्त बनले.
दुबई शहर हे फक्त वाळू आणि चिखलावर वसलेले आहे. त्यामुळे या पावसानंतर उघडय़ावर चिखल आणि वाळू दिसत असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले गेले. बुर्ज खलिफासारख्या गगनचुंबी इमारतींसाठी आणि सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या दुबई शहरातील हे जलतांडव विस्मयकारक होते. गतवर्षीही संयुक्त अरब अमिरातीमध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता. त्या वेळच्या पावसाने मागील 27 वर्षांचा विक्रम मोडीत काढला होता.
भारतातील राजस्थान राज्यानेही काही वर्षांपूर्वी हवामान बदलाचा अशा प्रकारचा कहर पाहिला होता. त्या वेळी थरच्या वाळवंटात मुसळधार पाऊस पडल्यामुळे बारमेर आणि जैसलमेरसारख्या शहरांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक वर्षांपूर्वी पश्चिम आशियातील काही देशांमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत होती. आता युरोपीय देशांमध्ये प्रचंड उष्मा असल्याच्या बातम्या येत आहेत.
गतवर्षी इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्येही अशाच प्रकारची विक्रमी वृष्टी झाली होती. या शहरात महापूर आला होता. येथे पूर्वी पाऊस हीच दुर्मिळ गोष्ट होती. लेबेनॉन, सीरिया, जॉर्डन, तुर्कस्तान, इराण इ. सर्व देशांत अभूतपूर्व उष्णतेच्या असह्य लाटा, अवर्षण, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, वादळे, वणवे अशा दुर्घटना सतत होत आहेत. रशियाच्या उत्तर – पश्चिमेकडे अलास्का- बेरिंगच्या समुद्रात खेकडय़ांचा दुष्काळ निर्माण झाल्याच्या बातम्या गतवर्षी समोर आल्या होत्या. वाढत्या तापमानामुळे गेल्या 5 वर्षांत उत्तर ध्रुवाजवळ 2अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानात जगणारे सुमारे एक हजार कोटी खेकडे मृत झाले. या बदलाला आपण हवामान बदल, ग्लोबल वार्ंमग किंवा वातावरणातील बदल इत्यादी कोणत्याही नावाने संबोधू शकतो, परंतु या सर्वांच्या मुळाशी एकच कारण आहे ते म्हणजे निसर्गाचे अपरिमित दोहन. त्याला निसर्गाने दिलेली ही प्रतिक्रिया आहे, असे म्हणावे लागेल. यंदाच्या वेळी दुबईतील आपत्तीचे कारण हा कृत्रिम पाऊस असल्याचं म्हटलं जातंय. दुबई प्रशासनाने सोमवारी आणि मंगळवारी क्लाऊड सीडिंगसाठी विमाने उडवली होती. या विमानांनी दोन दिवसांत एकूण सातवेळा उड्डाण केलं. वास्तविक पाहता पर्यावरण तज्ञांच्या म्हणण्यानुसार कृत्रिम पाऊस ही निसर्गाच्या रचनेला छेद देणारी प्रक्रिया आहे. क्लाऊड सीडिंगमुळे पावसाचे प्रमाण वाढवता येऊ शकते; पण यामुळे पर्यावरणीय समस्यादेखील उद्भवू शकतात. क्लाऊड सीडिंगमुळे इतरत्र संभाव्य दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असेही सांगितले जाते. यूएईमधील या जलतांडवाच्या मुळाशी क्लाऊड सीडिंग आहे का? हे अभ्यासाअंती स्पष्ट होईल, पण वेगाने वाढत चाललेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे मानवजातीने निसर्ग संवर्धनाबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कारण पर्यावरणाच्या अपरिमित हानीमुळे पृथ्वीवरील तापमानवाढीने उच्चांक गाठला आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनासाठी तापमानवाढ हानीकारक ठरत आहे. दरवेळी भीषण नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर याबाबत झोपेतून उठल्यासारखे जागे होऊन विचारमंथन करण्याने हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी सर्वसमावेशक आणि सर्वस्तरीय सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. अन्यथा अशा कितीतरी दुबई बुडतानाची दृश्ये ‘याचि देही याचि डोळा’ पाहावी लागू शकतात.