लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. ‘काँग्रेसचे न्यायपत्र म्हणजेच जाहीरनाम्यात नेमकं काय हे समजवून सांगण्यास आपल्याला आनंद होईल. त्यामुळे तुम्ही चुकीची वक्तव्ये करणार नाहीत’, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन पानी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘तुम्ही हे पत्र सकारात्मकतेने घ्याल. गेल्या काही दिवसांतल्या तुमच्या वक्तव्यांनी मी चकीत झालो नाही किंवा धक्काही बसला नाही. तुम्ही आणि तुमच्या पक्षाचे नेते निवडणुकीच्या पहिल्या पटप्प्यात अशाच प्रकारे बोलणार ही आपेक्षा होतीच’, असे पत्राची सुरुवात करत खरगे म्हणाले.
मंगळसुत्राचाही उल्लेख
‘तुम्ही आज गरीब आणि मागास समाजातील महिलांबद्दल बोलता. पण मणिपूरमध्ये महिला आणि दलित मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना हार घालण्यास तुमचे सरकार जबाबदार नाही का? तुमच्या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या करत होते, तेव्हा तुम्ही त्यांच्या मुलांची आणि पत्नीची सुरक्षा कशी करत होते? कृपया न्यायपत्र वाचा. हे न्यायपत्र आमची सत्ता आल्यावर लागू केले जाईल’, असे खरगे पत्रात म्हणाले.
मोदींचं भाषण म्हणजे खोटारडेपणाचा कळस, सिद्धरामय्यांचा पलटवार
‘पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा मोदींकडून मलीन’
‘काही शब्द संदर्भाच्या बाहेर नेऊन तुम्ही त्याला जातीय रंग देता, ही तुमची सवयच झाली आहे. असे करून तुम्ही पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा मलीन करत आहात. निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने पंतप्रधानांनी किती गलिच्छ भाषा वापरली होती; हे सगळं संपल्यांवर लोकांना आठवेल’, असा टोला खरगे यांनी लगावला.
‘सर्व जाती आणि धर्मातील तरुण, महिला, शेतकरी, मजूर आणि कष्टकऱ्यांना न्याय देण्याचा काँग्रेसचा न्यायपत्रामागचा उद्देश आहे. आमच्या जाहीरनाम्याबद्दल तुमचे सल्लागार तुम्हाला चुकीची माहिती पुरवत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी चुकीची विधाने करू नये. म्हणूनच तुमची भेट घेऊन मला न्यायपत्राचा हेतू समजवून सांगण्यास अधिक आनंद होईल’, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.