गेल्या 10 वर्षांत नरेंद्र मोदींनी निवडक अब्जाधीश उद्योगपतींसाठी सरकार चालवले आहे. यात सर्वात आघाडीवर नाव आहे ते अदानींचं. घरी गेल्यावर गुगल करून त्यांच्या शेअरच्या किमती बघा. ज्या दिवशी नरेंद्र मोदींचं सरकार आलं, त्यानंतर अदानींच्या शेअरची किंमत सातत्याने वाढत आहे. हे नरेंद्र मोदी यांचं सरकार म्हटलं जात असलं तरी सत्य हे आहे की हे अदानींच सरकार आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी भंडाऱ्यातील साकोलीमध्ये झालेल्या प्रचार सभेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
एका अब्जाधीशाचे हे सरकार आहे. सर्वकाही अदानींसाठी केले जात आहे. महाराष्ट्रात मुंबईच्या विमानतळाचे काम कुण्याचतरी हातात होते. त्याच्या सीबीआय चौकशी होते, दबाव आणला जातो, धमकावले जाते आणि जादूने काही दिवसांत ते विमानतळ अदानींकडे दिले जाते. यानंतर सर्व चौकशा बंद होतात. सीबीआय शांत होते आणि अदानी महाराष्ट्राचे सर्वात मोठे विमानतळ चालवतात, असे म्हणत राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली.
हे फक्त विमानतळांबाबत घडलेले नाही. हे बंदरांच्या बाबतीतही झाले आहे. हिंदुस्थानमधील जवळपास सर्व बंदरे अदानींच्या हातात आहेत. पायाभूत सुविधांचे प्रकल्पही अदानींकडे गेलेत. पूल आणि रस्ते बांधले जातात, फायदा अदानींचा होतो. खाणी त्यांच्याच, कोळसाही त्यांचाच, सौरउर्जा प्रकल्प त्यांचेच, वीज त्यांची. हे सर्व अदानांसाठी होतेय. त्यांच्यासोबत पाच ते दहा उद्योगपतींसाठी होत आहे, असा आरोप राहुल गांधी मोदी सरकारवर केला.
आज हिंदुस्थानात 22 असे धनाढ्य आहेत ज्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे जेवढी हिंदुस्थानमधील 70 कोटी जनतेकडे आहे. म्हणजे हिंदुस्थानच्या 50 टक्के लोकसंख्येकडे जितका पैसा आहे तितका पैसा 22 लोकांकडे आहे आणि 24 तास नरेंद्र मोदी कधी धर्मावर, कधी गरीबांवर तर कधी हिंदू-मुस्लिमांवर बोलतात. दोन जातींमध्ये भांडणं लावतात. पण त्यांचं लक्ष्य एकच आहे, तुमचा पैसा, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.