>>तुषार प्रीती देशमुख
मुंबईच्या खाद्यसंस्कृतीची खरी ओळख असणाऱया वडापावने मनोहरकाका, सुजलताई यांच्यासारख्या असंख्य वडापाव विक्री व्यवसाय करणाऱयांचे आयुष्य घडवले. अशा विक्रेत्यांनी माझ्यासारख्याला उपाशी न ठेवता प्रेमाने आपल्याला परवडेल इतक्या पैशांत पोटभर खाऊ घातले. माझ्या प्रवासाची सुरुवातही अशीच वडय़ाच्या फोडणीसारखी खमंग ठरली.
कौटुंबिक मतभेदांमुळे दहावीचं शिक्षण चालू असतानाच घर सोडायचं हे ठरवलं होतं. आईच्या निधनानंतर नववी-दहावीच्या काळात जगण्यासाठी आजीची साथ लाभली. अनेकदा जेवायला आम्हा दोघांना काही शिल्लक ठेवलं जायचं नाही. अशा वेळेला आजी राहिलेल्या शिळ्या भातात तेल, तिखट, मीठ घालून मला पोटभर खाऊ घालून स्वतही पोट भरायची. कधीतरी त्यात लपवून माझ्यासाठी कांदादेखील घालायची. तिने प्रेमाने भरवलेल्या एका घासातच पोट गच्च भरून जायचं. पुढे तिचीही साथ सुटली.
वाढत्या वयात भूक जास्त लागते. तसंच प्रत्येकाला सकस आहाराची गरज असते, पण याच काळात अनेक संकटांना सामोरं जात नोकरी करून, घरोघरी जाऊन पापड-लोणची विकून कॉलेजची फी भरायची. बाकीचे खर्च करून काही शिल्लक पैशांमध्ये दिवसभरात स्वतच्या पोटभरणीसाठी आधार मिळाला तो ‘एक बटाटावडा व त्याबरोबर सात पाव’ यांचा.
दादरमध्ये राहत असल्यामुळे अनेक वडापावच्या गाडय़ांवर वडापाव खायला जायचो, पण प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो ते दादर येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या नाक्यावरील असलेल्या मनोहर भोसलेकाकांच्या वडापावच्या गाडीचा. बटाटे शिजवण्यापासून फोडणी देईपर्यंत तसंच वडय़ाचं पीठ भिजवण्यापासून वडे तळण्यापर्यंतची काका-काकींची सगळी मेहनत डोळ्यांनी पाहिली आहे. अधूनमधून वडापाव खाण्यासाठी या गाडीवर जात असे. एकदा वडापाव खाण्यासाठी गेलो तेव्हा नेहमीप्रमाणे एक वडा आणि सात पाव मागवले खरे, पण सवयीप्रमाणे पहिल्यांदा खिशात पैसे मोजण्यासाठी हात गेला तेव्हा कळलं, पैसे कमी आहेत. पाच पाव कमी करायला सांगितले तेव्हा काकांनी “खा रे’’ म्हणत एक वडा आणि सात पाव त्या प्लेटमध्ये दिले. पैसे कमी आहेत हे लक्षात येताच काका प्रेमाने म्हणाले, “देशील रे नंतर…’’ हे ऐकताच प्लेटमधील त्या एका वडय़ाबरोबर सात पाव पोटभर खाल्ले. त्या दिवशी मला माझ्यासारख्या असंख्य भुकेलेल्या, खिशात कमी पैसे असलेल्यांसाठी जीवनदान देणाऱया पोटभरणीसाठीच्या वडापावच्या गाडीचे महत्त्व व वडापावावर जगणाऱया माझ्यासारख्या असंख्य व्यक्तींच्या भावना उमगल्या.
काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त माहीम मोगल लेन येथील वडापाव विक्रेत्या सुजल परबताईंची ओळख झाली. त्यांचा प्रवास ऐकून प्रेरणादायी ऊर्जा मिळाली. सुजलताईंचे सासरे शंभू भगवान परब यांनी 40 वर्षांपूर्वी अनेक अडीअडचणींना सामोरे जाऊन व्यवसायाची सुरुवात केली. तेव्हा त्यांना त्यांच्या बायकोची मोलाची साथ लाभली. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा संदीप व सुजलताईंनी संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी पेलली. त्यांच्या बायकोने त्यांना मोलाची साथ दिली. संदीपदादांच्या पश्चात एक महिला म्हणून ताईंना हा व्यवसाय करत असताना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. त्याचबरोबर अनेकांची मोलाची साथदेखील लाभली. त्यांनी अनेक वेगवेगळे पदार्थ तितकेच रुचकर बनवून सर्व खवय्यांना खाऊ घातले. त्या म्हणतात, ‘याच व्यवसायाने मला घडवले.’ सुजलताई हे सर्व सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू त्यांच्या खडतर, पण यशस्वी प्रवासाची ग्वाही देत होते.
मनोहरकाका, सुजलताई यांच्यासारख्या असंख्य वडापाव विक्री व्यवसाय करणाऱयांचे वडापावने आयुष्य घडवले व माझ्यासारख्याला उपाशी न ठेवता प्रेमाने आपल्याला परवडेल इतक्या पैशांत पोटभर खाऊ घातले. असा हा माझा ‘एक बटाटावडा, त्याबरोबर सात पाव’चा वडय़ाच्या फोडणीसारखा खमंग प्रवास. आज मनोहर भोसलेकाकांच्या तिन्ही मुली पूनम, नीलम आणि सोनम त्यांचा चाळीस वर्षांचा व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळत आहेत याचा अभिमान वाटतो. तसंच सुजल परबताईंची दोन्ही मुलं तृषाली व सिद्धांत नोकरी करून सुजलताईंना वडापाव विक्री व्यवसायात मदत करतात. तुमच्यादेखील बटाटावडय़ाबद्दलच्या काही ना काही आठवणी असतीलच ना?
…आणि हो, अशा या सर्व वडापाव विक्री करणाऱया अन्नदात्यांना मानाचा मुजरा!
(लेखक शेफ व युटय़ूबर आहेत.)