>> रविप्रकाश कुलकर्णी
प्रत्येक गावात काहीतरी असतेच असते. मग ते स्थानमहात्म्य असेल. गावात एखादे मंदिर असेल. त्याचे एक वैशिष्ट्य असेल. तसेच त्यासंबंधात कथा-दंतकथाही असतील. शिवाय त्या गावाचा प्राण म्हणजे तिथले लोक. त्यातले पूर्वी होऊन गेले असतील तर काही विद्यमान असतील. त्यांची दखल नेहमी घेतली जाते असे नाही, पण ती घ्यायला हवी…
त्याचे एक उदाहरण देतो. पर्यावरण चळवळीचा एक भाग म्हणून ‘सह्याद्री निसर्गमित्र’तर्फे सागरी गरुडाचे सर्वेक्षण चालू होते. या संस्थेचे कार्यकर्ते विजय महाबळ त्यासाठी मंडणगड तालुक्यातील वेळास येथील समुद्रकिनाऱ्यावर पाहणी करत असताना त्यांना वाळूत छोटे खड्डे आणि आजूबाजूला पडलेली पांढरी टरफले दिसली. ही बाब त्यांनी संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते भाऊ काटदरे यांना सांगितली. विजय महाबळ आणि भाऊ काटदरे यांनी त्याचा पाठपुरावा सुरू केला. तेव्हा त्यांना कळले की, ही कासवाची अंडी आहेत. हे दोघे येथेच थांबले नाहीत. वेळासचे सरपंच नंदकुमार पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी कासव संरक्षण मोहीम सुरू केली. साधारण नोव्हेंबर ते एप्रिल हा कासविणीच्या विणीचा हंगाम असतो. यादरम्यान कासवीण वाळूमध्ये एक ते दीड फूट खड्डा खोदून त्यामध्ये शंभर अंडी घालते. नंतर तो खड्डा वाळूने बुजवून कासवीण समुद्रात निघून जाते. काही काळानंतर ही अंडी उबल्यानंतर त्यातून जन्मलेली पिल्ले समुद्रात निघून जातात. ही सर्व नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र कासव संरक्षण मोहिमेत कासविणीने घातलेली अंडी संरक्षित केली जातात आणि ती उबल्यानंतर जी पिल्ले बाहेर येतात ती समुद्रात सोडण्यात येतात.
हा प्रयोग इतका यशस्वी झाला की, आता 80 ठिकाणी असा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात येतो. यातूनच 2006 साली वेळास येथे कासव महोत्सव आयोजित करण्यात आला. छोटी छोटी कासवाची पिल्ले समुद्राच्या दिशेने तुरुतुरु जातात हे पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडण्यासारखे असते. हा उत्सव पाहायला देश-परदेशातून लोक यायला लागले आहेत. यामुळे गावकऱ्यांना एक रोजगार उपलब्ध झाला. पुढे ‘सह्याद्री निसर्गमित्र’ने हा प्रकल्प स्थानिक कार्यकर्ते, ग्राम पंचायती व वन विभाग यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
गेल्या वीस-बावीस वर्षांतील हा इतिहास आहे. यासंबंधात ‘थिंक महाराष्ट्र’ने लेख लिहून पोर्टलवर टाकले. मग ठिकठिकाणच्या विविध वैशिष्ट्यांबद्दल अनेकांकडून मुद्दाम लेख लिहून घेण्यात आले. याबाबत संपादक दिनकर गांगल आणि गिरीश घाटे यांनी पोर्टलवरील घडामोडींची नोंद तीन प्रमुख प्रकारांत करायचे धोरण ठेवले आहे. पहिल्या प्रकारांत मराठी कर्तबगार व्यक्ती यांची नोंद आहे. ज्यात तारांकित व्यक्तीबरोबरच कर्तबगार, परंतु प्रसिद्ध अशा व्यक्तींची नोंद घेण्यात येते. दुसऱया प्रकारात थिंक महाराष्ट्र पोर्टलवर समाजातील सेवाभावी संस्था आणि त्यांचे कार्य याची नोंद असते. तिसरा नोंदीचा प्रकार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताच्या नोंदींचा. यामध्ये गडकिल्ले, वाडे, लेणी, जत्रा, यात्रा, प्रथा, परंपरा ते थेट खाद्य संस्कृतीची दखल या विभागात घेतलेली दिसते. पोर्टलवरील लेखात काही वेळा तर इतकी अपरिचित माहिती असते की, तेच या लेखाचे आगळेपण ठरते. सदाशिव अमरापूरकर यांच्यावर त्यांच्या पत्नीने म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांनी मृत्युलेख लिहिला आहे. त्यात त्यांनी सांगितलेले आहे, “त्यांना नगरबद्दल अकृत्रिम जिव्हाळा वाटत असे. त्यांना नगरचे लोक, कार्यकर्ते, गुणी कलाकार… सगळ्यांचे कौतुक वाटे. त्यांनी नगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली तेव्हा गोविंदा, जॉनी लिव्हर, असरानी अशा सोळा कलाकारांना सोबत घेऊन ‘स्टार नाईट’चा कार्पाम 1997 साली केला आणि संग्रहालयासाठी मोठा निधी उभा करून दिला. दुःखद गोष्ट अशी की, सदाशिवची आई कार्पामाच्या आधी दोनच दिवस निवर्तली, पण सदाशिवने ठरवलेले सत्कार्य पार पाडले. डबघाईला आलेले संग्रहालय पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले.” अशा दुर्मिळ माहितीसाठी हे लेख लक्षात राहावेत.
विशेष गोष्ट म्हणजे पोर्टलवरील 2023 मधील लेख आता छापील माध्यमातूनदेखील वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयोग ‘थिंक महाराष्ट्र’ने केलेला आहे. संस्कृती वैभव, सेवाभावी संस्था आणि व्यक्तिरेखा असे ते तीन खंड आहेत. या प्रयोगाचे स्वागत व्हावे. वेळ जाण्यापूर्वी आतापासून ते केले पाहिजे या दृष्टिकोनातून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलची स्थापना झाली आणि हे कार्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना झालेली आहे.