पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही राजवटीला पराभूत करून जनतेचे राज्य आणणे हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे. काँग्रेस पक्षाची शिस्तबद्ध कार्यकर्ता या नात्याने मुंबईतील सहाही जागांवर विजयी मिळवण्यासाठी काम करू, असा निर्धार काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आज व्यक्त करीत नाराजीच्या वृत्ताला पूर्णविराम दिला.
लोकसभेच्या मुंबईतील जागावाटपावरून मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबईत काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत असल्यानेच काँग्रेसने याआधी सहाही मतदारसंघांत विजय मिळावलेला होता आणि त्यात काँग्रेसच्या पाच व राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा होती. यावेळी महाविकास आघाडी म्हणून जागावाटपात मुंबई काँग्रेसने तीन मतदारसंघाची मागणी केली होती, पण दोनच मतदारसंघ मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये खंत आहे. विशेषतः मुंबई दक्षिण- मध्य मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत म्हणून कार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविक आहे, परंतु पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आदर असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जागावाटप ठरविताना पक्षश्रेष्ठाRना कठोर भूमिका घ्यायला हवी होती, जागावाटपाबाबत पक्षाची भूमिका पक्षश्रेष्ठाRना कळविली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पक्षाने एकदा भूमिका घेतली की पक्षाचे काम करणे ही माझी आणि माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार केलेला आहे. पक्षाची शिस्त आणि विचारधारा हे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मी नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून आल्या त्यात काहीही तथ्य नाही. पक्षाने एकदा भूमिका घेतली की, पक्षाचे काम करणे ही माझी आणि माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार केलेला आहे.
वर्षा गायकवाड, मुंबई अध्यक्षा काँग्रेस