शनिवारी तीन वाईट गोष्टींचा विचित्र योग होता. देशात असा योग पहिल्यांदाच आला असेल. एकतर सूर्यग्रहण होते, दुसरे म्हणजे अमावस्या होती आणि तिसरे म्हणजे नरेंद्र मोदी यांची सभा होती.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्रात येऊन बाहेरच्या नेत्याने असली शिवसेना आणि नकली शिवसेना ठरवायचे, हा कहरच झाला. खंडणी गोळा करणाऱया पक्षाचे नेते शिवसेनेला नकली ठरवत आहेत. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा मोदी कदाचित हिमालयात असतील. मोदींचा भारतीय जनता पक्षच ‘‘चंदा दो, धंदा लो’’ म्हणणाऱया खंडणीखोरांचा भाकड आणि भेकड पक्ष असून ‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा’ हेच त्यांचे धोरण आहे. त्यांच्या सोबत ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सबरोबर असलेली सेना ही वसुली सेना आहे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी आज लगावला.
महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि आघाडीच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी महाराष्ट्रासह सर्व देशवासीयांना उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. पंतप्रधान मोदी आणि भाजपवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे यांनी या वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आभार व्यक्त केले. महाविकास आघाडी जास्त व्यापक होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. आघाडीतील घटक पक्षांनी एकही जागा न मागता घटनेचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी आघाडीला ताकद दिली, असे प्रशंसोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.
प्रकाश आंबेडकरांबद्दल आदर कायम
अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होऊ शकली नाही असा मुद्दा माध्यमांच्या प्रतिनिधींनी या वेळी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना आघाडीने काही जागा देऊ केल्या होत्या. मात्र दुर्दैवाने ते शक्य झाले नाही. प्रकाश आंबेडकर यांचा आम्ही आजही तेवढाच आदर करतो आणि त्यांनी आमच्यावर काहीही टीका केली तरी आम्ही त्यांना उत्तर देणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. संविधान रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर यांनीदेखील सोबत येण्याची आवश्यकता असल्याचे आम्हाला आजही वाटते, असेही ते पुढे म्हणाले.
मोदींना शिवसेना गुजरातला पळवायची होती
खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्याने शिवसेनेला हिणवणे बरोबर नाही, असे सांगतानाच, मोदींना शिवसेना गुजरातला पळवायची होती, पण आपण पळवू दिली नाही, असा खळबळजनक आरोपही उद्धव ठाकरे यांनी या वेळी केला. त्यामुळेच मोदी त्यांच्या जवळ बसलेल्या चायनीज मालावरच सुख मानत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवरही निशाणा साधला.
– काँग्रेसने देशासाठी एक उत्तम जाहीरनामा बनवला आहे. इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर त्या जाहीरनाम्यात महाराष्ट्राशी संबंधित मुद्देही समाविष्ट केले जातील असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर न झाल्यामुळे तयारी असावी म्हणून शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांनी प्रचार सुरू केला होता. आज तिथे काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला असून उत्तर मुंबईतील शिवसैनिक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रचार करतील असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
भाजप हा भाकड, भेकड आणि भ्रष्ट पक्ष
भाजप हा भाकड, भेकड आणि भ्रष्ट कसा हेसुद्धा उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. पेंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून देशभक्त पक्षांना सतावणारा, त्यांच्यावर धाडी टाकणारा, धमक्या देणारा भाजप हा भेकड पक्ष आहे. भाजपमध्ये कुणी नेता निर्माणच झाला नाही म्हणून तो भाकड पक्ष आहे. अशोक चव्हाणांचा आदर्श वेगळा, पण भाजप विचारांचा आदर्श कुणालाही देऊ शकला नाही, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला. भ्रष्ट इतक्यासाठीच की, संपूर्ण देशातील ‘भ्रष्ट तितुका मेळवावा आणि भाजप पक्ष वाढवावा’ हेच त्यांचे धोरण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सभा भाकड पक्षाच्या नेत्याची होती
चंद्रपूरच्या सभेत नरेंद्र मोदी यांचे झालेले भाषण हे पंतप्रधानांचे नव्हते, तर ज्यांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘कमळाबाई’ म्हणायचे त्या भाकड, भेकड आणि भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी यांची ती प्रचार सभा होती, अशी चपराकही उद्धव ठाकरे यांनी लगावली.
भाजप हे खंडणीखोरांचे केंद्र
पूर्वी मुंबईत असे वातावरण होते. मारुती 1000 ही नव्याने आली होती. ती गाडी कुणी विकत घेतली की, गाडी घेणाऱयाला कोणत्या तरी भाईचा फोन जायचा आणि त्याच्याकडे खंडणी उकळली जायची. तसे खंडणी गोळा करणारे भाजप हे केंद्र बनले आहे, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली. एकेकाळी एनडीए स्थापन केली होती, मात्र आताचा भाजप हा केवळ ‘ठिगळं’ जोडून एकत्र झालेल्यांची युती आहे, असा भीमटोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
शिवसेनेने प्रत्युत्तर दिले तर पंतप्रधानांना नव्हे, मोदींना असेल
पंतप्रधान मोदी एकाच पक्षाचा प्रचार करत असल्याने त्यांना पंतप्रधान म्हणता येणार नाही. निवडणूक प्रचार पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले तर घटनेवर हात ठेवून जी शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे उद्या शिवसेनेने त्यांना प्रत्युत्तर दिले तर ते पंतप्रधानांना नव्हे, तर राजकीय विरोधक असलेल्या पक्षाच्या एका नेत्याला उत्तर दिल्याचे समजावे, देशाच्या पंतप्रधानांचा अवमान शिवसेनेकडून होणे कदापि शक्य नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
अमित शहा ‘मातोश्री’वर लोटांगण घालायला आले होते
भाजपने स्वतःचा इतिहास तपासून पहावा असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीचा दाखलाही या वेळी दिला. 2019 मध्ये भाजपचे तत्कालीन अध्यक्ष असलेले अमित शहा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पह्टोसमोर लोटांगण घालण्यासाठी आले होते. त्या वेळी मातोश्रीवर आपणही उपस्थित होतो आणि ती हीच शिवसेना होती. त्यामुळे भाजपला जरी विसर पडला असला तरी महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.