आम्ही रामाचे पुजारी, भाजप रामाचे व्यापारी! जयराम रमेश यांनी मोंदीच्या टीकेवर दिले प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप सातत्याने काँग्रेसला सनातन विरोधी म्हणत असल्याच्या आरोपावरून जयराम रमेश यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण जाणीवपूर्वक नाकारल्याचा आरोप पंतप्रधान मोदी निवडणूक रॅलींमध्ये काँग्रेसवर सातत्याने करत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, तो कार्यक्रम पूर्णपणे राजकीय असल्याने आम्ही त्याचे आमंत्रण आदरपूर्वक नाकारले. आम्ही रामाचे पुजारी आहोत आणि भाजपची लोकं रामाचे व्यापारी असल्याचा जबरदस्त टोला जयराम रमेश यांनी लगावला आहे.

जयराम रमेश यांनी हे वक्तव्य सोमवारी छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडणूक रॅलीदरम्यान झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी म्हणाले होते की, राम नवमी येत आहे, त्यामुळे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांनी निमंत्रण कसे नाकारले होते हे सर्वांनी विसरू नये. त्यावर एएनआयला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रत्युत्तर देत भाजप धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे, त्यांनी धर्म आणि राजकारण देखील खालच्या पातळीवर आणले असल्याचा हल्लाबोल भाजपवर केला आहे. पुढे ते म्हणाले की, भाजप ‘रामाचे व्यापारी’ आहेत, तर काँग्रेसचे नेते रामाचे ‘पुजारी’ आहेत. 22 जानेवारीला अयोद्धेतील राममंदिरात प्रभू श्री रामाचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. तो संपूर्ण कार्यक्रम राजकीय होता. हा कार्यक्रम केवळ एक राजकीय पक्ष आणि त्या पक्षातील व्यक्तीची इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आयोजित केला गेला होता.आम्ही रामाचे पूजक आहोत आणि भाजप रामाचे व्यापारी असल्याची टीका जयराम रमेश यांनी केली आहे.

जयराम रमेश पुढे म्हणाले की, ”माझ्या नावातही राम आहे. एक नाही दोनदा आहे, कोणी मला रामविरोधी म्हणू शकत नाही” असा इशाराच जयराम रमेश यांनी यावेळी दिला.