मोदी आणि शहा यांच्या राजकीय आणि वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्यलढय़ात भारतीयांच्या विरोधात ब्रिटिश आणि मुस्लिम लीगला पाठिंबा दिला होता. आता भाजपचा आलेख ढासळू लागल्यामुळे संघाला पुन्हा आपल्या जुन्या मित्राची मुस्लिम लीगची आठवण झाली असावी, या शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संघ, भाजप आणि मुस्लिम लीग यांच्यातील जुन्या दोस्तानावर शरसंधान केले आहे.
काँग्रेसचे न्याय पत्र म्हणजे मुस्लिम लीगचाच जाहीरनामा वाटत असल्याचे सांगत मोदींनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती. त्याचा खरपूस समाचार खरगे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये घेतला आहे. 1942 मध्ये महात्मा गांधींच्या ‘भारत छोडो’ या आवाहनाला आणि मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखालील चळवळीला मोदी-शहा यांच्या राजकीय पूर्वजांनी विरोध केला होता. तुमच्या पूर्वजांनी 1940 मध्ये बंगाल, सिंध आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रांतात मुस्लिम लीगसोबत आपली सरकारे स्थापन केली हे सर्वांना माहीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नरला लिहिलेल्या पत्राचा दाखला त्यांनी दिला.