‘भाजपचे नेते म्हणविणारे देवेंद्र फडणवीस कुठल्या तरी अंधाऱया गुहेमध्ये चाचपडत आहेत. सध्या महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार असा सामना आहे. महाराष्ट्रात मोदींचा सपशेल पराभव होणार. नरेंद्र मोदी व भाजपविषयी राज्यात व जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा फायदा महाविकास आघाडीला निश्चित मिळेल,’ असा ठाम विश्वास शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हे गेले दोन दिवस सांगली जिह्याच्या दौऱयावर आहेत. आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज्यातील सद्यपरिस्थितीवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी अशी लढत असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याचा जोरदार समाचार संजय राऊत यांनी घेतला. ‘लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार असाच सामना होणार आहे. भाजपला जनतेमध्ये मोठा विरोध असून आमचा विजय होणार आहे. मिंधेंचा पक्ष हा भाजपची बी टीम आहे,’ असे त्यांनी ठणकाविले.
‘राज्यात आज मिंधे गटाचे अस्तित्व शून्य आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाणही त्यांनी चोरला. मिंधे तो धनुष्यबाणही वाचवू शकलेले नाहीत. हा धनुष्यबाण त्यांना भाजप वापरू देत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व भाजपला महाराष्ट्रातून संपवायचे आहे आणि त्यासाठीच त्यांनी ही तयारी सुरू केली आहे,’ असे संजय राऊत यांनी सांगितले. ‘कोकणसह महाराष्ट्रात 40 ते 50 वर्षे धनुष्यबाणावर शिवसेनेने अधिराज्य गाजविले, परंतु भाजपच्या कूटनीतीमुळे धनुष्यबाण आज अडचणीत सापडला आहे. त्यामुळेच कल्याण-डोंबिवलीची उमेदवारी मिंधेऐवजी भाजपने जाहीर केली, असेच म्हणावे लागेल,’ असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
हा पायलट विमान गुजरातमध्ये उतरवेल अशी शंका!
‘काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची एक चित्रफीत माझ्या पाहण्यात आली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘विमानाचा पायलट जिथे नेईल, तिथे मी उतरेन.’ बहुतेक हा पायलट विमान थेट गुजरातमध्ये उतरवेल की काय?’ अशी शंकाही संजय राऊत यांनी व्यक्त केली.
पतंगराव, आर. आर. आबाहे दिलदार मनाचे नेते
डॉ. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे प्रतिभावंत, दिलदार मनाचे मोठे नेते होते. राजकारणापलीकडे त्यांनी मैत्री जपली होती. आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांनी उमटवला होता, अशा भावना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.