>> हिमांशू भूषण स्मार्त
नाटक : साठेचं काय करायचं? (मराठी संचातील नाटक)
नाटक हे एक समग्र घटित मानताना नाटककार आणि दिग्दर्शकाला उपलब्ध प्रयोगकाळाचे नियोजन-व्यवस्थापन करायचे असते. नाटकाचा प्रकार नाटकातला महत्तम खंड निश्चित करतो. दोन अंकी नाटकात तो दोन अंक मिळून बनतो. एकांकिकेत तो सलग चाळीसएक मिनिटे असतो. तर नाटक बहुप्रवेशी असेल तर मोठ्या खंडाच्या पोटात छोटे खंड बनतात. हे सारे घडवताना लेखक-दिग्दर्शकाची सर्जनशीलता पणाला लागत असते.
उपलब्ध प्रयोगकाळाचे नियोजन-व्यवस्थापन हा कोणत्याही नाटकाच्या नाटकीयतेमध्ये निर्णायक करणारा मुद्दा असतो. अशा वेळी नाटककार आणि पुढे जाऊन दिग्दर्शकाला प्रयोगकाळाच्या महत्तम खंडाचे काय करायचे? हा निर्णय तर घ्यायचाच असतो, पण लघुतम खंडाचे काय करायचे? हा निर्णयही घ्यायचा असतो. नाटकाचा प्रकार नाटकातला महत्तम खंड निश्चित करतो. दोन अंकी नाटकात तो दोन अंक मिळून बनतो. एकांकिकेत तो सलग चाळीसएक मिनिटे असतो. नाटक बहुप्रवेशी असेल तर मोठय़ा खंडाच्या पोटात छोटे खंड बनतात. त्यांची कालिक लांबी-रुंदी कमी-अधिक असू शकते. नाटक हे एक समग्र घटित मानले तर त्याच्या पोटात घटनांचेही खंड असतात. या घटना-प्रसंग घडण्याचा काळ आणि नाटकाच्या मोठय़ा खंडामधला छोटा खंड यांचे गणित जुळावे लागते.
राजीव नाईक यांचे ‘साठेचं काय करायचं?’ हे प्रयोगकाळाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने लक्षणीय नाटक. अन्य अर्थानेही महत्त्वाचे आहेच, परंतु तूर्तास आपण आपल्या सूत्रानुसार त्याचा विचार करूया. ज्या घटनांच्या, पात्रवर्तनाच्या, दृश्यांच्या ताण्याबाण्यातून हे नाटक तयार होते त्यात हा लक्षणीय ठसठशीत उलटा टाका आहे. त्याने नाटकाचा पोत प्रभावित होतो. हे नाटक मूलत: दहा प्रवेशांचे आहे. कालिकदृष्ट्या विचार करता एक प्रवेश वगळता (जो उलटा टाका आहे) बाकीचे प्रवेश साधारणत समान लांबीचे आहेत. राजीव नाईकांनी केलेली या प्रवेशांची बांधणी, त्यांचा उत्कर्ष क्रम यांबद्दल स्वतंत्रपणे लिहिण्यासारखे आहे.
जाहिरात उद्योगात असणारा अभय, इंग्रजीची प्राध्यापिका असणारी त्याची पत्नी सलमा या दोन पात्रांमध्ये हे नाटक घडते. प्रत्यक्षात न येणारे, परंतु नाटकाला आकार देणारे ‘साठे’ नावाचे पात्रही या नाटकात आहे. ते फक्त अभय आणि सलमाच्या चर्चेत येते. ते वगळले तर नाटक नाटक उरणार नाही. त्याचे न येणेच नाटकाच्या नाटकीयतेला उन्नत करते. त्याची अदृश्य छाया नाटकाचा ताण गहिरा करते. ते आले असते तर नाटकाचा पोत सर्वथा बदलला असता. या नाटकांमधल्या सातव्या प्रवेशाची चर्चा आपण इथे करणार आहोत. नाटकातला उलटा टाका. दोघेही बुद्धी आणि सर्जन यांचा योग असणाऱ्या क्षेत्रात काम करणारे आहेत. ‘साठे’ नावाचा अभयचा सहव्यावसायिक आहे. तो येनकेन प्रकारे स्पर्धेत पुढे राहतो. तो केवळ स्पर्धेत पुढे नसतो, तर त्याने स्वतला एका उच्चस्तरीय-एलिट स्तरात प्रस्थापित केलेले असते. अभयला वाटते, आपण मात्र फक्त अॅडफिल्म करत बसलेलो आहे. साठे फालतू काम करतो, पण ‘आर्टी’ असल्याचे दावे करतो आणि त्याचे लाभ मिळवतो. अभयच्या ‘आर्टी’ कुणी मोजत नाही ही अभयची खदखद आहे. साठे त्याच्या मानगुटीवर बसलेला आहे. अभयच्या सलमाशी असणाऱया नात्यातही याचे ताण घुसलेले आहेतच. सलमा अभयची दांभिक त्रस्तता वारंवार उघडी पाडते. संपूर्ण नाटकभर अभय आणि सलमाच्या ताणग्रस्त चर्चा-वाद-संवाद घडत राहतात. वास्तविक पाहता अभय आणि सलमाचे वैवाहिक नाते ठीकच आहे, पण साठेमुळे अभयने आणलेली चिडचिडी त्रस्तता सलमालाही त्रस्त करते. त्यामुळे नात्यामधले उत्कट क्षण नाटकामध्ये अभावानेच येतात. दैनंदिन जगण्यामधल्या सहमतीच्या क्षणांनी ही उत्कटतेची कमतरता भरून काढली जाते. नाटकाच्या एकूण मांडणीमुळे नाटकामधल्या संवादांना खंडनमंडणाचे, युक्तिवादाचे, मुद्दे प्रधान आाढमकतेचे रूप प्रबळपणे प्राप्त होते. त्यामुळे या नाटकाचे श्राव्यही टोकदार आणि गतिमान झालेले आहे. नाटकामधल्या अनेक संवादांना, प्रश्न आणि त्यावरचे उत्तर असे रूप आलेले आहे. हे सारे लेखकाने हेतुत: केलेले असल्याचे जाणवते. नाटकाचे शीर्षकदेखील प्रश्नार्थ आहे हे विशेष. प्रश्नार्थकता हा या नाटकाच्या संवादरचनेचा अभिन्न भाग आहे, हे मात्र निश्चित. या वैशिष्टय़ाचा नाटकाच्या नाटकीयतेवरही थेटच परिणाम होतो. दुसरे असे की, नाटकात प्रश्नार्थकता आणि विराम यांचे प्रमाण समसमान असते तर नाटकात एक प्रकारचा ठहराव आला असता, परंतु असे होणे लेखकाला अभिप्रेत नसावे. किंबहुना ठहरावांचा अभाव हाच अभय-सलमाच्या नात्याला ग्रासून राहिलेला अनुभव म्हणून लेखकाला तीव्र करायचा आहे.
नाटकातले सातवे दृश्य मात्र अत्यंत वेगळ्या प्रकृतीचे आहे. या दृश्यात ना प्रश्नांचे डोंगर उभी करणारी सलमा दिसते ना युक्तिवादांचे डोंगर उभे करणारा अभय दिसतो. अर्थात प्रश्नार्थकता इथेही कायमच राहते, पण तिचे रूप काहीसे संयत, स्वीकारशीलतेतून उद्भवलेले, ठहराव असणारे होते. या दृश्याच्या सुरुवातीला मंच रिकामा आहे. सलमा प्रवेश करते, दिवाणावर बसून रडायला लागते. अभय तिला रडण्याचे कारण विचारतो. सलमा म्हणते, “कारण कशाला हवं रडायला?” अभय हताश, नुसताच बसून राहतो. एवढेच हे दृश्य आहे. प्रयोगकाळातला तुलनेने कमी खंड व्यापणारे. एका बाजूला सलमाची व्याकूळता आणि दुसऱ्या बाजूला अभयची क्रियाहीन हताशा, अशा दोन गतीदृष्ट्या जवळ जवळ शून्यतेपर्यंत पोहोचणाऱ्या, दृश्य अवस्था नाटकाचा पोत पालटून टाकतात. याआधीच्या दृश्यात अभय सलमाला म्हणालेला असतो, “आपल्या गप्पांना सुरुवात-मध्य-शेवट नसतोच. सुरुवात-मध्य की, परत सुरुवात.” अभय आणि सलमाच्या नात्यांमध्ये छोटय़ा-छोटय़ा पूर्णत्वाचा अभाव आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातल्या चकमकींचा पारा सतत चढलेला असतो. सातव्या दृष्टात मात्र सारी त्रस्तता गळून पडते. सलमा आणि अभय यांच्यातला विशुद्ध-उत्कट क्षण आल्यासारखा वाटतो. असे वाटते की, हा अभय आणि सलमाच्या मुक्ततेचा क्षण आहे. परंतु असे अर्थातच घडत नाही.
या उलट्या टाक्यातून लेखकाला काय साधायचे असावे? या प्रवेशात जे घडते ते या नाटकातले सर्वाधिक मानवी दर्शन आहे. जवळ जवळ नितळ. जवळ जवळ पारदर्शक, परंतु सर्वथा नाही. अत्यंत तीव्र गतीने जाणारा नाटय़ानुभव या दृश्यात काहीसा संथावतो. त्याचे त्वरण घटते. या प्रवेशातल्या संवादाच्या श्राव्याचा पोतही गहिरा, मंद्राकडे जाणारा आहे. त्यामुळे दृश्यात्मकतेच्या स्तरावरही हा प्रवेश, प्रयोगकाळाचा वेग मंदावणारा होतो. प्रवेशाच्या सुरुवातीला सलमा काहीशा वेगाने येते, प्रवेशाच्या शेवटी ती हळू रडत राहते आणि अभय हताश नुसताच बसून राहतो. या प्रवेशावर सत्ता गाजवते ती एक अनादी प्रकारची रिक्तता. मंचाची रिक्तता भेदत सलमा येते आणि प्रवेशाच्या अखेरीस सलमा-अभय एक रिक्तताच अधोरेखित करत राहतात. या दर्शनाने सलमा-अभय खरीखुरी पारदर्शक माणसे होतात, स्त्राr-पुरुष होतात, जोडीदार होतात. हेही खरेच की, हे खरेखरे होणे तत्काळ कशातच निष्पन्न होत नाही, परंतु या प्रवेशाला दिलेले नाटकीय रूप; पात्रांना, नाटकाच्या प्रयोगकाळाला, प्रेक्षकांना, पात्रा-प्रेक्षकांच्या चित्तवृत्तींना-अटीतटींना शांतवत राहते. ‘साठेचं काय करायचं?’मधला हा सर्वात ठसठशीत उलटा टाका आहे. तसे छोटे छोटे उलटे टाके नाटकभर येत राहतातच, परंतु सातव्या प्रवेशाचा उलटा टाका नाटकाची नाटकीयता सर्वाधिक प्रभावित करतो.
(लेखक नाट्यक्षेत्राचे अभ्यासक आहेत)