काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गांधी घराण्यातील व्यक्तीने इथून निवडणूक लढवावी, अशी अमेठीतील जनतेची इच्छा असल्याचे रॉबर्ट वाड्रा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
मी राजकारणात आलो तर अमेठीतून मी निवडणूक ( Congress News ) लढवावी, इतकी मोठी आपेक्षा अमेठीतील जनतेला आहे. कारण स्मृती इराणी यांना निवडून दिल्याचा अमेठीतील जनतेला पश्चाताप आहे. यामुळे अमेठीच्या जनतेला पुन्हा गांधी घराण्यातील सदस्याला प्रचंड मतांनी जिंकून द्यायचे आहे, असा दावा रॉबर्ट वॉड्रा यांनी केला.
जो कोण खासदार होईल त्याने जातीभेदाचे राजकारण करण्याऐवजी इथला विकास आणि प्रगतीवर भर द्यावा. चुकीचा लोकप्रतिनिधी निवडल्याने कदाचित अमेठीच्या जनतेला दुःख आहे. यामुळे अमेठीची जनता सध्या चिंतेत आहे, असे ते पुढे म्हणाले.
राहुल गांधींची शेअर बाजारात कोट्यवधींची गुंतवणूक, वाचा पोर्टफोलिओमध्ये कोणते शेअर…
रॉबर्ट वाड्रा यांचा स्मृती इराणींवर निशाणा
विकासात अमेठी पिछाडीवर आहे. पायाभूत सुविधांवर लक्ष न देता विद्यमान खासदार नेहरू-गांधी घराण्यावर विनाकारण टीका करण्यात व्यग्र आहेत. यातून अमेठीच्या नावाने फक्त राजकारण होतंय, विकास नाही. यामुळे अमेठीतील जनता नाराज आहे, असे म्हणत वाड्रा यांनी भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांना टोला लगावला आहे.
1999 पासून माझे आणि अमेठीचे नाते आहे. त्यावेळी प्रियंकासोबत प्रचारात सहभागी झालो होतो. राजकारणात ती माझी सुरुवात होती. त्यावेळचे राजकारण हे वेगळ्या स्वरुपाचे होते. तिथे संजय सिंह होते. प्रचार मोहीमेत आम्ही रात्रभर पोस्टर लावत फिरत होतो. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत होतो, असे त्यांनी सांगितले.
Lok Sabha Election 2024 : वायनाडमधून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
अद्याप उमेदवाराची घोषणा नाही
काँग्रेसने अद्याप अमेठीतून उमेदवाराची घोषणा केलेली नाही. या पार्श्वभूमीवर रॉबर्ट वाड्रा यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. रॉबर्ट वाड्रा हे अमेठीतून निवडणूक लढणार, काँग्रेसचे उमेदवार असणार? अशी जोरदार चर्चा आहे. अमेठी, रायबरेली आणि सुलतानपूर सारख्या मतदारसंघांचा काँग्रेसने विकास केला आहे. खास करून गांधी घराण्याचे या मतदारसंघांची एक विशेष नाते जोडले गेले आहे, असे रॉबर्ट वाड्रा म्हणाले.