लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली आहे. बुलढाणा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
“संतांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात अनाजी पंत सक्रिय होते. त्या त्या काळातील अनाजी पंतांचा विचार समाजात थेढ निर्माण करण्याचे काम करत होता. आजही तो विचार सक्रिय आहे. आधुनिक अनाजी पंतांनी आमचंही घर फोडलं, तीनचार पवार तिकडे गेले. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर याचा काहीही परिणाम होणार नाही. कारण पवार साहेबांच जे कुटुंब आहे ते फक्त पवार आडणावाच नाही. या महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक आहेत. ते म्हणजे पवार साहेबांच कुटुंब आहे,” असे म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजप आणि मिंध्यांना टोला लगावला.
“पवार परिवार फोडण्यात ते काहीसे यशस्वी झाले असले तरी भाजप सोबत कोण गेलं? तर मुठभर नेते. जे नेते पडणार आहेत ते नेते तिकडे गेले. आमच्या सोबत असलेले नेते निष्ठावान, लढणारे अन् जिंकणारे आहेत. हे त्यांनी ध्यानात ठेवावे. दिल्लीतील महाशक्तीने फोडा-झोडाची नीती वापरत राज्यात पक्ष आणि घराणे फोडले. आमच्या बाबतीत जे केले तेच ठाकरेंच्या बाबतीत केले. तिकडे जाणारे लाचार नेते आज दिल्लीत लोटांगण घालत उमेदवारीची मागणी करत आहेत. मात्र मराठी जनता यांच्या सोबत जाऊच शकत नाही. कारण इथली जनता स्वाभिमानी आहे. दिल्ली समोर झुकणारी नाही तर, लढणारी आहे,” असे म्हणत रोहित पवारांनी गद्दारांना थेट आव्हान दिले आहे.
“न्यायालयाने दिलेल्या सूचना लक्षात घेतल्या तर, अजित पवार गटाकडे केवळ लोकसभा निवडणुकीपुरतेच घड्याळ आहे. मूळ राष्ट्रवादीच्या घड्याळाची वेळ 10.10 अशी होती. मात्र यांच्या घड्याळाची वेळ 4.20 मिनिटे आहे. आता 420 असे म्हटले जाते,” असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार गटाची खिल्ली उडवली आहे.