मला सातत्याने अपमानित करणे, मला कमकुवत करणे हाच माझ्या अटकेमागील एकमेव उद्देश आहे, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. ईडीने कोणतीही चौकशी, विधान किंवा अटकेचा आधार असू शकेल असे पुरावे नसताना मला अटक केली, असा आरोपही केजरीवाल यांनी आज जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान केला. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने जामीन याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे.
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवाल यांना अटक केली आहे. केजरीवाल यांनी जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप विजयासाठी विरोधी पक्षांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच तपास यंत्रणा मागे लावून निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्यात येत आहे. तसेच आपला फोडण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी केजरीवाल यांची बाजू मांडली.
पहिले मतदान होण्यापूर्वी आपचा पाडण्याचा डाव
अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. त्यांना अटक करण्यापूर्वी घरी त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्नही ईडीने केला नाही, याकडेही अभिषेक सिंघवी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. पहिले मतदान होण्यापूर्वीच आम आदमी पक्षाला पाडण्याचा डाव सत्ताधारी पक्षाने रचल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.
केजरीवालांचे वजन साडेचार किलोने घटले
आपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केल्यापासून आतापर्यंत त्यांचे साडेचार किलो वजन घटले आहे, तर तिहार तुरुंग प्रशासनाने केजरीवाल यांची प्रकृती उत्तम आहे. येथील डॉक्टरांनीही त्यांच्या तब्येतीबाबत कोणताही चिंता व्यक्त केलेली नाही, असा दावा केला.
इलेक्ट्रिक किटली, टेबल-खुर्ची देण्याचे आदेश
अरविंद केजरीवाल यांची तब्येत पाहता त्यांना टेबल, खुर्ची, पुस्तके आणि चहा किंवा पाणी गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक किटली देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने तिहार तुरुंग प्राधिकरणाला दिले. विशेष न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांनी याबाबतचे निर्देश दिले. याशिवाय कारागृहाची नियमपुस्तिकाही केजरीवाल यांना देण्यास सांगितले.
केजरीवाल यांचे ईडीला प्रश्न
1. अरविंद केजरीवाल पळून जाण्याची शक्यता होती का?
2. दीड वर्षात कोणत्याही साक्षीदारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला का?
3. केजरीवाल यांनी चौकशी करण्यास नकार दिला का?