पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आल्यामुळे पालिका कामाला लागली असून पावसाळय़ाआधी मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील सर्व रस्त्यांची तपासणी करून खड्डे बुजवण्यात येणार आहेत. शिवाय नालेसफाई करताना पाणी तुंबणाऱया ठिकाणी विशेष काम करून पावसाळय़ात पाणी तुंबणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे धोरण पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. यामध्ये सुमारे 400 किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पालिकेकडून कार्यवाहीदेखील सुरू आहे. मात्र शहरातील 1400 कोटींची निविदा काढूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पुन्हा निविदा मागवण्यात आल्या आहेत. तर दोन्ही उपनगरांतील 910 कामांपैकी 787 कामे अजून सुरू झालेली नाहीत. यातच पावसाळा काही दिवसांवर आल्यामुळे खड्डय़ांचा मनस्ताप रोखण्यासाठी संपूर्ण मुंबईत खास पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येईल. ज्या ज्या ठिकाणी खड्डे असतील ते पावसाळय़ाआधी बुजवण्यात येतील, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
अशी आहे मुंबईतील रस्त्यांची सद्यस्थिती
मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँक्रिटचे करण्यासाठी सहा हजार कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. यात मुंबईत 397 किमी अंतरात 910 रस्त्यांच्या कामांपैकी आतापर्यंत फक्त 123 कामे सुरू झाली असून उर्वरित 787 कामांना सुरुवातही झालेली नाही. यातील फक्त 11 कामे पूर्ण झाली असून 4 प्रगतीपथावर आहेत.
मास्टीक तंत्रज्ञानाने दुरुस्ती
मुंबईतील रस्त्यांची पावसाळय़ाआधी दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता मास्टीक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये केवळ खड्डा न बुजवता संपूर्ण रस्त्याची सरफेस मास्टिक पद्धतीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. मास्टीक डांबरीकणात 180 ते 200 अंश डिग्री सेल्सिअस तापमान असते. ते सर्वात जलद गतीने स्थिर होते. त्यामुळे अपयशी ठरल्यामुळे कोल्डमिस्कऐवजी मास्टीक अस्फाल्टचा वापर करणार.