मिंधे गटाला भाजपचा दणका, लावणीफेम उमेदवाराला मतदान करणार नाही; भाजप कार्यकर्त्यांची तुफान घोषणाबाजी

लावणीफेम उमेदवाराला अजिबात मतदान करणार नाही असा दणका आज हिंगोली लोकसभा मतदारसंघातील तब्बल सहा विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी मिंधे गटाला दिला. अथर्व लॉनमध्ये पार पडलेल्या भाजपच्या आढावा बैठकीत या संतप्त कार्यकर्त्यांनी गद्दार उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत हेमंत पाटील यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केल्याने मिंधे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, बैठकीस उपस्थित आमदार मुटकुळे यांनी तर ही जागा भाजपला सोडण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.

मागील काही दिवसांपासून हिंगोली लोकसभेवर मिंधे गटाचे विद्यमान खासदार लावणीफेम हेमंत पाटील तर भाजपचे आमदार व इच्छुक पदाधिकारी दावा सांगत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हिंगोलीसह ६ लोकसभा मतदारसंघात सामान्य नागरिकांसह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. भाजप पदाधिकार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाल्यामुळे आज रविवारी अथर्व लॉन येथे हिंगोली लोकसभा भाजप आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला आमदार तानाजी मुटकुळे, भीमराव केराम, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, रामदास पाटील सुमठाणकर, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, किशोर देशमुख, माधव सुपारे, उमेश नागरे, सर्व आघाडी सेलचे जिल्हाध्यक्ष, मंडळाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सुपरवॉरीयर्स, सर्कलप्रमुख, बूथप्रमुखांसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हेमंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी

या बैठकीच्या सुरुवातीलाच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खुर्च्या उंचावून ‘दुर्री.. तिर्री…एक्का… हेमंत पाटील …, या हेमंत पाटलाच करायच काय.. खाली मुंडक वर पाय..’ अशी घोषणाबाजी केली. व्यासपीठावरील पदाधिकार्‍यांनी शांत बसण्याचे आवाहन केले तरी कार्यकर्ते हेमंत पाटलांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत होते. यावेळी हिंगोली, वसमत, कळमनुरी, किनवट, माहूर व उमरखेड या सहा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांनी हेमंत पाटील यांच्यावर रोष व्यक्त करत खासदार केल्यानंतर त्याने पाच वर्षांत आम्हाला विचारले नाही. लिड दिली त्या गावाला आजपर्यंत भेट दिली नाही. त्यामुळे त्यांना आम्ही गावात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला.

…तर भाजप पदाधिकार्‍यांनीही गावात येऊ नये

एका कार्यकर्त्याने तर हिंगोली लोकसभेची उमेदवारी खासदार व आमदाराने भाजपच्या दोन डझन मंडळींवर हे दोघे भारी पडले, असा मिश्कील टोला लगावला. उमरखेडच्या कार्यकर्त्याने तर आम्हाला वाटलं की उमरखेड एकच मतदारसंघ असल्याने हेमंत पाटील सौतीने वागत असतील असे वाटले होते. परंतु, हिंगोलीकरांचे तर आमच्यापेक्षा बेकार हाल आहेत. अशा शब्दात पाटील यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. महायुतीचा उमेदवार हेमंत पाटील असेल तर आम्ही त्याला गावागावांत फिरू देणार नाही. त्याच्यासोबत भाजपच्या पदाधिकार्‍यांनी गावात येऊ नये, अन्यथा वाईट परिणाम होईल, असा इशारा दिला.

भाजपलाच जागा द्या – आमदार मुटकुळे

हेमंत पाटील यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये नाराजी आहे. आदिवासी, मराठा व ओबीसी समाजासह सर्वच समाजातील नागरिकांचा रोष त्यांच्यावर असल्यामुळे हिंगोली लोकसभेची जागा भाजपला सोडण्यात यावी, अन्यथा हेमंत पाटील यांच्या जागी भाजपच्या एखाद्या पदाधिकार्‍याला शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, असे हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले.