मराठा आरक्षण देतो म्हणून समाजाचा विश्वासघात करणारांचा करेक्ट कार्यक्रम आणि सगेसोयर्यांच्या कायद्याला पाठिंबा देणारांना मत, अशी स्पष्ट भूमिका शनिवारी मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारही देणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.
२४ मार्च रोजी आंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी ३० मार्च रोजी लोकसभा निवडणूक, मराठा उमेदवार यावर आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. आज राज्यभरातून आलेल्या अहवालांचे अवलोकन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले. आपण कुणाच्याही प्रचाराला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकारणापासून दूर राहण्याचे संकेत देत असतानाच त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावर ज्यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला, त्यांचा करेक्ट कार्यक्रम आणि सगेसोयर्यांच्या कायद्याला पाठिंबा देणारांना मत अशी आपली भूमिका असल्याचे सांगितले. ज्याला पाडायचे आहे त्याला पाडा, ज्याला निवडून द्यायचे आहे त्याला निवडून द्या पण मत देताना आयाबहिणींच्या पाठीवर पोलिसांनी उठवलेले वळ विसरू नका, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आपल्या जिवाचे बलिदान दिले. आंदोलनात कित्येकांवर गुन्हे दाखल झाले, काहीना जेलातही जावे लागले. काहीना अपंगत्व आले, अनेक होतकरू तरुणांचे शिक्षण आरक्षणाअभावी थांबले या सर्व गोष्टींचा मतदान करताना जरूर विचार करा, असे आवाहनही यावेळी मनोज जरांगे यांनी केले. राजकारणापेक्षाही आरक्षण महत्त्वाचे आहे. समाजाची एकी अभंग राहणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे राजकारणापासून दूरच राहण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असेही ते म्हणाले. लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही. मराठा समाजाने आपल्या सदसद्विवेक बुद्धीवर मतदान करावे. पण मतदान करताना आपल्यावर झालेला अन्यायही विसरू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुणालाही पाठिंबा दिला नाही
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह धनगर, मुस्लिम, मागासवर्गीय, लिंगायत तसेच इतर अनेक समाजाच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन आपल्याशी लोकसभा निवडणुकीवर चर्चा केली होती. परंतु, ३० तारखेला मराठा समाजाचा येणारा अहवाल आणि त्यातील समाजाची मते पाहूनच अंतिम निर्णय घ्यायचा होता. त्यामुळे आपण कोणालाही पाठिंबा दिला नाही, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.