>> महेश कोळी
माहिती-तंत्रज्ञानाचे विश्व बहरत आहे तसतसे सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत चालले आहे. सायबर विश्वातील गुन्हेगार याच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या आविष्कारांचा आधार घेत गुन्हे करत आहेत. सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटिलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाने सोयी सुविधांत वाढ झालेली असताना दुसदुरीकडे याच्या मदतीने होणारे व्हॉइस क्लोनिंगही नवीन समस्या म्हणून समोर येत आहे. ‘एआय’पासून तयार होणारे व्हॉइस क्लोनिंग हे ‘डीपफेक’सारखे नवे प्रकार समोर आणत आहे. अशा स्कॅमरकडून अगदी आईवडिलांच्या आवाजाची नकल करून पैशांची मागणी करत गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. नेमका काय आहे हा प्रकार?
भारतासह संपूर्ण जगात सायबर गुन्हेगार त्याचा वापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करत आहेत. ‘एआय’च्या मदतीने ओळखीच्या लोकांच्या आवाजाची नक्कल करत दिशाभूल केली जात आहे. त्याला एआय ‘व्हॉइस क्लोनिंग’ असे म्हटले जाते. याक्षेत्रात प्रचंड प्रगती होत असल्याने गुन्हेदेखील वाढले आहेत. सायबर गुन्हेगारासाठी नवीन शस्त्र म्हणून समोर आले आहे. या माध्यमातून कोणालाही सहजपणे टार्गेट करत फसवणूक करता येते. सायबर गुन्हा करणारे फसवणुकीसाठी क्लोन केलेल्या आवाजाचा वापर करतात. उदा बँक, कंपनी यासारख्या विश्वसनीय संस्थांचे प्रतिनिधी एवढेच नाही तर पीडितांचे मित्र किंवा नातेवाईकांचा आवाज वापरत व्यक्तिगत माहिती किंवा पैसे चोरण्यासाठी कॉल केला जातो किंवा ध्वनीमेल संदेश पाठवला जातो. जेणेकरून लोकांच्या भावनांशी खेळत कारस्थान तडीस नेले जाते.
‘मॅकअॅ फी’च्या अहवालानुसार, 69 टक्के भारतीय नागरिक हे मानवी आवाज आणि एआयनिर्मित आवाज यांच्यातील फरक ओळखण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यामुळेच व्हॉइस क्लोनिंगचे गांभीर्य वाढत चालले आहे. त्याच वेळी ‘द आर्टिफिशियल इम्पो स्टर’च्या अहवालानुसार 47 टक्के भारतीयांना त्याचा फटका बसला आहे किंवा व्हॉइस क्लोनिंगला बळी पडलेल्या लोकांना ते ओळखत आहेत. जागतिक पातळीवर अशा रीतीने फसलेल्या लोकांची संख्या 25 टक्के आहे. या शिवाय ‘एनसी आरबी’च्या अहवालानुसार 2022 मध्ये 65893 सायबर गुन्हे नोंदले गेले. त्याच वेळी 2021 मध्ये 52974 प्रकरणे नोंदली गेली आहेत. यात सर्वाधिक सुमारे 65 टक्के प्रकरणे फसवणुकीची आहेत. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञाना बरोबरच ठग देखील स्मार्ट असतात. फसवण्याची पारंपरिक पद्धत सोडून ते ऑनलाइनवर सहजपणे फसवणूक करत आहेत. व्हॉइस क्लोनिंगमुळे फसवणूक होण्याची शक्यता सर्वाधिक राहते. कारण यातंत्रापासून बहुसंख्य मंडळी अनभिज्ञ असतात.
व्हॉइस क्लोनिंग हे एआय तंत्रज्ञान असून ते हॅकरला कोणाचाही आवाज रिकॉर्ड करून त्या आवाजाला ‘एआय’ टूलने विकसित करून त्याला नवे रूप देण्याची सुविधा प्रदान करतो. सध्या व्हॉइस क्लोनिंगसाठी असंख्य पेड आणि मोफत टूल्स आहेत किंवा सॉफ्टवेअर आहेत. त्याचा सहजपणे वापर करत व्हॉइस क्लोनिंग करता येते. एकदा आपण व्हॉइस रेकॉर्डिंगचा पुरेसा डेटा एकत्र गोळा करतो त्यावेळी व्हॉइस क्लोनिंग अॅ प या डेटाचे संपादन करण्यास सुरुवात करते. डेटाला वेगवेगळ्या ध्वनिलहरीत विभागले जाते. या आधारावर एआय त्याचे आकलन करत आवाज क्लोनिंग करण्याच्या प्रक्रियेला प्रतिसाद देते. एआय पुन्हा या ध्वनिलहरींना संबंधित स्वर, भाषेत छोट्या छोट्या भागात विभागते. अशा वेळी व्हॉइस क्लोनिंगचा धोका हा केवळ व्यक्तिगत किंवा आर्थिक जोखमीपर्यंतच मर्यादित राहत नाही. या तंत्रज्ञानाचा वाढत्या दुरुपयोगामुळे बरेच नुकसान होऊ शकते. एआय तज्ञांच्या मते, बनावट ऑडिओ किंवा व्हिडीओमुळे चुकीची माहिती पसरली जाऊ शकते. एकप्रकारे जगातील अनेक देशांत अशांतता निर्माण होऊ शकते. परिणामी लोकशाही मार्गाने पार पाडल्या जाणाऱ्या निवडणुकांना फटका बसू शकतो. कारण निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या भाषणाचा वापर करत व्हॉइस क्लोनिंगची समस्या ही उग्र रूप धारण करू शकते. सायबर गुन्हेगार हे विविध स्रोतांतून आवाजाचे नमुने एकत्र करू शकतात. जसे सोशल मीडियावरील व्हिडीओ, सार्वजनिक भाषण एवढेच नाही तर इंटरसेप्ट केलेले कॉल या आधारे आवाजाचे नमुने एकत्र केले जाऊ शकतात. तूर्त आज एआयच्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या दुरुपयोगामुळे व्हॉइस क्लोनिंगचे आव्हान मोडून काढण्याची गरज आहे.
तज्ञांनी व्हॉइस क्लोनिंगचा आवाज ओळखण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत. एखाद्याशी बोलताना आपल्यांला समोरून अनेक प्रकारचे आवाज ऐकू येत असेल तर वेळीच सावध राहा. कारण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या खोलीत आवाज क्लोन केलेला असू शकतो. अर्थात तंत्रज्ञानाच्या विकासाने असे संकेत ओळखणे कठीण आहे. परंतु अशा तंत्राबाबत सजग राहणे काळाची गरज आहे. तसेच तातडीने पैसे मागितले जात असतील तर सावध व्हा आणि समोरील व्यक्तीला असे प्रश्न विचारा की तो गोंधळात पडावा. त्या चबरोबर डिजिटल फुटप्रिंटबाबतही सजग राहण्याची गरज आहे. शिवाय ऑनलाइन अपलोड करण्यात येणाऱ्या कागदपत्रांबाबतही काळजी घेतली पाहिजे. अनोळखी कॉलपासून सावध राहा आणि प्रामुख्याने अनोळखी नंबर किंवा तातडीची मदत हवी असल्याचा दावा करणाऱ्या कॉलपासून सावध राहा. आपली सजगता ही फसवणुकीपासून आपला बचाव करू शकते.
(लेखक संगणक अभियंता आहेत)