संपूर्ण मराठवाड्यात माझ्यावर गुन्हे दाखल करायचे आणि त्यानंतर मला तडीपार करायचे स्वप्न गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत आहेत. फडणविसांनी हे स्वप्न बघू नये, अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे समर्थन करणार नाही असेही ते म्हणाले.
बीड येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दात टीका केली. माझ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. गुन्ह्यांची संख्या वाढवायची आणि मग मला तडीपार करायचे, असा फडणवीसांचा डाव असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. फडणवीस जेवढे माझ्या विरोधात जातील तेवढ्याच ताकदीने मराठा समाज माझ्या पाठीशी उभे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकीकडे गुन्हे मागे घेतो अशा भूलथापा मारायच्या आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करण्याचे चालूच ठेवायचे, असा दुतोंडी कारभार फडणवीसांचा असल्याचा पलटवारही त्यांनी केला.
24 तारखेच्या सभेत निर्णय घेणार
24 मार्च रोजी आंतरवाली सराटी येथे निर्णायक सभा होणार आहे. या सभेत अनेक विषय असून, गेल्या ७० वर्षांतील सगळ्याच गोष्टींचा उâहापोह करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले.