महायुतीत तिकीट वाटपात तणातणी वाढली; माढ्यात तिढा कायम

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये उघड बंड झाले असतानाच आता साताऱयातही भाजपची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी मंत्री गिरीश महाजन यांनी अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांची मनधरणी केली. त्या वेळी त्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. आज महाजन यांनी साताऱयात खासदार उदयनराजे यांची भेट घेऊन साखरपेरणी केली. बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या तीन पक्षांमध्ये तिकीट वाटपात जास्त तणातणी सुरू असल्याची कबुली महाजन यांनी दिली.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीत नाराजीचा भडका उडाला आहे. विजयसिंह मोहिते-पाटील तसेच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उघडपणे वेगळी भूमिका घेतल्याने माढय़ाचे गणित बिघडणार असे दिसू लागताच काल देवेंद्र फडणवीस यांचा सांगावा घेऊन गिरीश महाजन अकलूजमध्ये दाखल झाले. त्या वेळी महाजन यांनाही रोषाला सामोरे जावे लागले.

फडणवीस यांचा सांगावा घेऊन गिरीश महाजन आज दुपारी बाराच्या सुमारास अकलूजमधून साताऱयात दाखल झाले. छत्रपती शिवाजीमहाराजांचे वंशज असूनही उदयनराजे यांना वेटिंगवर ठेवल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांना राग आहे. त्यातच शनिवारी उदयनराजे यांनी ‘आपण संन्यास घेणार नाही’ असे सूचक वक्तव्य करून निवडणूक लढवणारच असल्याचा इरादा स्पष्ट केल्याने भाजपसाठी माढय़ाच्या पाठोपाठ साताऱयाची डोकेदुखी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी जलमंदिर पॅलेस येथे येऊन उदयनराजे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेपासून माध्यमांना दूर ठेवले गेले.
चर्चा झाल्यानंतर गिरीश महाजन उदयनराजे यांच्यासह पत्रकारांना सामोरे गेले. पश्चिम महाराष्ट्रात तीन पक्षांमध्ये तिकीट वाटपाच्या बाबतीत जास्त तणातणी सुरू आहे, हे कबूल करतानाच उदयनराजे यांच्याबाबतीत तिकीट मागण्याची गरजच नाही. उलट त्यांना तिकीट देणे ही पक्षाची गरज आहे, असे महाजन यांनी सांगितले.

महाजन पत्रकारांवर घसरले
उदयनराजे यांना उमेदवारी नाकारल्यास भाजपला मराठा समाजाचा रोष ओढवून घ्यावा लागेल, असे पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता महाजन पत्रकारांवर घसरले. तशी वेळ येणारच नाही. तुम्हाला कोणी सांगितले तिकीट नाकारले म्हणून? उदयनराजे यांना तिकीट नाकारलेले नाही. तुम्ही का सतत नाकारले सांगता? असा सवाल त्यांनी केला.

माढय़ात तणाव ही वस्तुस्थिती
रणजीत नाईक-निंबाळकर यांच्याबाबतीत विजयसिंह मोहिते-पाटील यांचे वेगळे मत आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यासाठी फडणवीस यांनी आपल्याला पाठवले होते. काल त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. पुन्हा फडणवीस त्यांच्याशी बोलतील आणि सर्व प्रश्न सुटतील, असे सांगत त्यांनी माढय़ाचा तिढा कायम असल्याची अप्रत्यक्षपणे कबुलीच दिली.

पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम – शिवेंद्रराजे
उदयनराजे यांच्या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे ही जागा भाजपकडेच राहिली पाहिजे. उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल. ते मी ठरवू शकत नाही. पण पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांचे काम करणार, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे भोसले यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.