‘सरकारला इंजिन नाही, फक्त भ्रष्टाचाराराची चाकं आहेत. जोपर्यंत भ्रष्टाचार जोरात आहे, तोपर्यंत सरकार चालणार. ज्या दिवशी आम्ही भ्रष्टाचारावर हल्ला, सरकार उद्ध्वस्त करू त्या दिवशी भाजप आणि त्यांच्यासोबतच्या दोन सहकाऱ्यांचेही काही चालणार नाही’, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचारापासून बनलेला पक्ष आहे. मोदींनी महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसबाबत ‘नॅशनलिस्ट करप्त पार्टी’ असे विधान केले होते, पण ते त्यांच्याच पक्षासाठी लागू होते. भ्रष्टाचारापासून बनलेला पक्ष, भ्रष्टाचाराला समर्थन देणारा आणि भ्रष्टाचाऱ्यांसाठी काम करणारा पक्ष ही भाजपची ओळख आहे. भाजप नेत्यांनी आरशात पाहिले तर त्यांना फक्त भ्रष्टाचार दिसेल.’
महाराष्ट्रात ऑनलाईन लॉटरीचा जुगार सुरू आहे. या जुगारामुळे तरुण मुलं, नोकरदार, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे यावर बंदी आणावी अशी मागणी पत्राद्वारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. पण यातून मोठा हप्ता मंत्रालयाला, पोलिसांना जातोय अशी माझी माहिती आहे. मग कारवाई कशी होणार? असा सवाल उपस्थित करत खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, काल निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांची यादी जाहीर केली. मी तक्रार केली त्या फ्युचर गेमिंग हा जो लॉटरी किंग आहे त्याने भाजपला कोट्यवधी रुपये दिल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रातील जनतेला, तरुणांना जुगार आणि व्यसनाधीन करून भाजप अशाप्रकारे खिसे भरत असेल तर याचा विचार लोकांना करावा लागेल. महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येत आहे. ड्रग्जच्या व्यापाऱ्यांनीही निवडणूक रोखे खरेदी करून भाजपच्या खात्यात तर पैसे टाकले नाही ना? त्यामुळे कारवाई होत नसावी, असेही राऊत म्हणाले.
आचारसंहिता लागल्यानंतर पंतप्रधान हे पंतप्रधान रहात नाहीत. परंतु नरेंद्र मोदी आजही सरकारी विमानं, सरकारी लवाजामा घेऊन घोषणा करत आहेत. हे आचारसंहितेचे उल्लंघन नाही का? विरोधी पक्षाला एक मैदान मिळत नाही आणि मोदी सरकारी तामझाम वापरून आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. कुठे आहे निवडणूक आयोग? असा सवालही राऊत यांनी केला.
दरम्यान, “अडीच वर्षांनी आलो तर असा आलो की दोन्ही पक्ष फोडून आलो”, या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचाही राऊत यांनी समाचार घेतला. ज्या दिवशी केंद्रात सरकार आल्यावर आमच्या हातात ईडी आणि सीबीआय येईल त्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी हे वाक्य पुन्हा बोलून दाखवावा. त्या दिवशी त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नसेल. शेवटी लोहा ‘लोहे को काटता है’ आपल्याला माहिती आहे, असा घणाघात राऊत यांनी केला. तसेच घराणेशाहीवरून टीका करणाऱ्यांनाही राऊत यांनी सुनावले. भारतीय जनता पक्ष दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. त्यांना स्वत:ची पोरं नाहीत. ते आमचे फोडलेले लोकं घेऊन बसलेले आहेत. त्यामुळे स्वत:चे पाळणे हलवा, दुसऱ्यांचे पाळणे हलवू नका. ते परत पळून जातील, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा
जागावाटप संपलेले असून रामटेकची जागा काँग्रेसला देण्याची चर्चा झाली आहे. कोल्हापूरमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज लढणार आहेत. ती आमची सीटिंग जागा होती. मात्र छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून लढणार असल्याने त्या बदल्यात आम्ही सांगलीची जागा घेतली. सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासाठी मीरज येथे सभाही होणार आहे, असेही राऊत म्हणाले.