देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधून सुरू असतानाच राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापत आहे. मराठा आदोलक मनोज जरांगे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आरक्षणाबाबत इशारा दिला आहे. निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली मराठ्यांना न्याय दिला नाही तर मग यांना आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. आता मराठ्यांना हा निर्णय घ्यावाच लागेल. हजारो पोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत, माता माऊली रस्त्यावर आहेत. पूर्वीच्या राजाला दया यायची या राजाला दया येत नाही. आचारसंहितेच्या नावाखाली मराठ्यांचे प्रश्न दाबले जात आहेत, असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.
मराठा समाजाच्या नाराजीची लाट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना अंगावर घ्यायची नसेल तर त्यांना सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागेल. अन्यायकारक निर्णय लादून चालणार नाही. सात महिन्यांपासून मराठे रस्त्यावर आहेत. त्यांची चेष्टा करु नका अन्यथा समाजाला नाईलाजाने निर्णय बदलावा लागेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी बाकी आहे. आमच्या बाजूने निर्णय झाला नाही तर आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल असा इशाराच मनोज जरांगेंनी दिला आहे.
आत्ताच्या राजाला स्वार्थ आणि सत्ता दिसते आहे. अन्यायकारक निर्णय झाले तर आम्ही शांत बसणार नाही. राजकारण्याचा सर्वाधिक जीव गुलालात असतो. आता हे असं वागणार असतील तर गुलाल यांना आयुष्यभर लागू द्यायचा की नाही हे मराठा समाजाला ठरवावं लागेल. महायुतीला 48 पैकी एकही जागा जिंकू देणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.