चांगली झोप ही निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाने किमान सात ते आठ तास झोपणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा महिलांची आठ तास झोपूनही झोप पूर्ण होताना दिसत नाही. त्यांना थकवा जाणवतो. याचे कारण म्हणजे महिलांना पुरूषांपेक्षा जास्त झोप घेण्याची आवश्यकता आहे. पुरूष सात ते आठ तासांच्या झोपेवर चांगले काम करु शकतात मात्र महिलांना त्यापेक्षा जास्त तास झोपण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक रुग्णालयातील डॉ. सोनम सिम्पतवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या स्त्रीरोगतज्ज्ञ असून पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना झोपेची जास्त गरज असते. इंडिया टुडे या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
स्त्रियांना जास्त झोप घेण्याची आवश्यकता का आहे ते जाणून घेऊया.
चांगली झोप का आवश्यक?
मॅग्निफ्लेक्स इंडियाच्या झोप विशेषज्ञ डॉ निवेदिता कुमार सांगतात की, झोप हा चांगल्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. चांगली झोप मेंदूची कार्यक्षमता वाढवते, हृदयाचे आरोग्य चांगले राखते, चयापचय चांगले होते आणि त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारते. एवढेच नाही दिर्घायुष्य मिळते. चांगल्या झोपेमुळे उत्साह वाटतो. चिंता, नैराश्य कमी करते. चांगली झोप न मिळाल्य़ाने स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर यांसारखे न्यूरोलॉजिकल आजार होऊ शकतात. पुढे लठ्ठपणा, हृदयविकार आणि पक्षाघात होण्याचा धोका वाढतो. याबाबत आर्टेमिस रुग्णालयाचे सल्लागार डॉ. अरुण कोटारू म्हणतात, झोपेच्या दरम्यान, शरीरात स्नायूंची वाढ आणि संप्रेरक नियमन यासारख्या आवश्यक प्रक्रिया होतात.दीर्घकाळच्या झोपेची कमतरता शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्षणीय प्रतिकूल परिणाम करू शकते.
झोपेच्या गरजा वयानुसार बदलतात
नवजात आणि लहान मुलांना सर्वात जास्त झोपेची आवश्यकता असते. तर प्रौढांना चांगल्या आरोग्यासाठी आणि कामकाजासाठी रात्री 7 ते 9 तासांची झोप लागते. वयानुसार झोपेची गरज थोडीशी कमी होत असली तरी वृद्ध व्यक्तींना प्रति रात्री सुमारे 7 ते 8 तासांची झोप लागते. डॉ निवेदिता कुमार सांगतात की, अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की, महिलांना पुरुषांपेक्षा सुमारे 20 मिनिटे जास्त झोप लागते. झोप ही मेंदूसाठी आणि स्वतःला निरोगी राखण्यासाठी महत्त्वाची आहे. स्त्रियांची झोप आणि झोपेच्या विकारांबाबत फारसा डेटा उपलब्ध नसला तरी, संशोधनातून स्त्रियांना दैनंदिन कामकाजामुळे पुरुषांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असू शकते डॉक्टर म्हणतात. याचे कारण असे की, स्त्रियांचा मेंदू पुरुषांपेक्षा अधिक गुंतागुंतीचा असतो. स्त्रिया अधिक कार्य करण्यासाठी आणि त्यांच्या मेंदूचा अधिक वापर करण्यासाठी ओळखल्या जातात. दरम्यान, स्लीप फाउंडेशनने नमूद केल्याप्रमाणे सरासरी प्रौढ व्यक्तीला दररोज सात तासांची झोप लागते आणि महिलांना सरासरी 11 अतिरिक्त मिनिटे झोपेची आवश्यकता असते. याव्यतिरिक्त, स्त्रियांना निद्रानाश, चिंता आणि नैराश्य येण्याची शक्यता असते, ज्यामुळे झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. संशोधन हेही दाखवतं की, स्त्रियांची झोपेची क्षमता पुरुषांपेक्षा चांगली आहे. तर पुरुषांपेक्षा स्त्रियांना निद्रानाशाचा धोका सुमारे 40 टक्के जास्त असतो.
महिला मल्टीटास्कर आहेत!
पुरुषांच्या तुलनेत, स्त्रिया घरातील प्रत्येकाच्या गरजा भागवत असल्याने त्या मल्टिटास्कर असतात. साधारणपणे, स्त्रिया त्यांच्या आरोग्यापेक्षा त्यांच्या जबाबदाऱ्यांना अधिक प्राधान्य देतात. यामुळे त्यांचा मानसिक आणि भावनिक दृष्ट्या निचरा होतो असे बेंगळुरूच्या ग्लेनेगल्स BGS हॉस्पिटलमधील मानसशास्त्रज्ञ सुमलता वासुदेव सांगतात. झोपेवरही स्वभावातील गुणांचा प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त, एखाद्या विशिष्ट ताण आणि तणावाचा प्रभाव पुरुष आणि स्त्रियांमध्ये भिन्न असतो.
चांगल्या झोपेसाठी या गोष्टींची काळजी घ्या
– सातत्यपूर्ण झोपेचे वेळापत्रक तयार करा
– झोपण्याआधी ध्यानधारणा आणि हलके स्ट्रेच यांसारख्या विश्रांती तंत्रांचा समावेश केल्याने शांत झोप लागते.
– झोपेच्या ठिकाणी थंडावा, अंधार आणि शांतता ठेवून झोपायला हवे
– झोपताना मोबाईलचा वापर टाळा.
– कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन टाळा.
– नियमितपणे व्यायाम करा
– ताणतणाव कमी करण्यासाठी दीर्घ श्वास, ध्यान किंवा योगसाधना करा.
– आहारात जड जेवण, मसालेदार पदार्थ आणि झोपेच्या जवळ जास्त प्रमाणात द्रवपदार्थ टाळा.